लाळ खूरकूतचे वास्तव | Foot and Mouth Disease

Foot-Mouth-disease

लाळ खूरकूतचे वास्तव

फूट अँड माउथ डिसीज (FMD) हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे जो भारतातील पशुधनांना प्रभावित करतो, ज्यात गुरेढोरे, डुक्कर, मेंढ्या आणि शेळ्या यांचा समावेश होतो. यामुळे ताप, फोड आणि तोंडात आणि पायात फोड येतात, ज्यामुळे वजन कमी होते, दुधाचे उत्पादन कमी होते आणि लंगडेपणा येतो. हा रोग थेट संपर्क, दूषित खाद्य आणि शेती उपकरणे याद्वारे वेगाने पसरतो. FMD पशुधन उत्पादकता कमी करून आणि महाग नियंत्रण उपाय आवश्यक करून महत्त्वपूर्ण आर्थिक आव्हाने उभी करतो. भारतातील एफएमडीचा मुकाबला करण्याच्या प्रयत्नांमध्ये लसीकरण कार्यक्रम, कठोर जैवसुरक्षा उपाय आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कृषी क्षेत्रावरील आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी देखरेख यांचा समावेश आहे. चारा टंचाईचा सामना संपूर्ण देश वर्षभर करित असतो. दुधाचे न परवडणारे दर, दूध वाहतुकीच्या आणि साठवणूकीच्या समस्या, दुधातील भेसळ अशा अनेक संकटांशी पशुपालन आणि डेअरी उद्योग नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता हा उद्योग लाळ्या खुरकूत या रोगाच्या भयानक वास्तवामुळे चर्चेत आला आहे.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 
  • लाळ्या खुरकूत आणि भारत 
  • लाळ्या खुरकूत रोगाचे प्रकार आणि लक्षणे
  • लसीकरण हाच एकमेव रामबाण उपाय 
  • निष्कर्ष

लाळ्या खुरकूत आणि भारत | Foot & mouth Disease and India

खरं तर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायालाच शेतकर्‍यांची अधिक पसंती असते. कारण या व्यवसायापासून शेतकर्‍यांना नियमित पैसे मिळतात. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दैनंदिन गरजा भागविल्या जातात. म्हणून दुग्धव्यवसायात प्रगती करण्यासाठी पशुधन सुदृढ असणे, ही सर्वात प्राथमिक गरज समजली जाते. परंतु भारतातील लाळ्या खुरकूत रोगाचे वास्तव अभ्यासले तर जनावरे वर्षभर सुदृढ राहतीलच की नाही, या शंकेने आता शेतकर्‍यांना पछाडलेले आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून जूनपर्यंत बर्‍याच भागात लाळ्या खुरकूतच्या साथी येतात. या रोगात मरतुकीचे प्रमाण जरी कमी असले तरी लाळ्या खुरकूत रोगामुळे शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान होते, म्हणजे या रोगामुळे जनावर आजारी पडून औषधोपचारात भरपूर खर्च तर होतोच पण आजारातून बरे झाल्यावर जनावरे अनुत्पादक होऊन आपले नुकसान करतात. 

    तसेच या रोगाच्या साथी दरवर्षी भारतात येतात आणि प्रचंड नुकसान करून जातात. विशेष म्हणजे हा रोग सर्वच उत्पादक प्राण्यांना म्हणजे गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व उंट यांना होतो. बर्‍याच विकसित देशांनी त्यांच्या देशात प्रतिबंधनात्मक उपाय योजून या रोगाचे तेथे समूळ उच्चाटन करण्यात यश मिळविले आहे. पण लाळ्या खुरकूत रोगाबाबत भारतातील स्थिती इतर देशांच्या तुलनेत अत्यंत चिंताजनक आहे.

लाळ्या खुरकूत रोगाचे प्रकार आणि लक्षणे | Types and symptoms of foot and mouth disease

लाळ्या खुरकत रोग (FMD) हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. आपला देश या रोगाचा दरवर्षी सामना करतो. फूट अँड माऊथ डिसीज हा रोग  गुरेढोरे, डुक्कर, मेंढ्या आणि शेळ्यांसह खूर असलेल्या प्राण्यांना प्रभावित करतो. हा रोग Picornaviridae कुटुंबातील FMD विषाणू (FMDV) मुळे होते.  हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे यावर खात्रीलायक उपचार नाहीत, म्हणून या आजारावर प्रतिबंधनात्मक उपाय वेळीच करणे आवश्यक झाले आहे. लाळ्या खुरकूत या विषाणूजन्य रोगाचे सात प्रकार आहेत- ए, ओ, सी, एशिया-१, एसएटी-१, एसएटी-२, एसएटी-३. यापैकी ए, ओ, सी आणि एशिया-१ या विषाणूंचा प्रभाव जास्त आढळतो. रोगाचा प्रसार, जनावरांची लाळ, संसर्ग झालेले खाद्य, पाणी, संपर्कातून होतो. हा आजार देशी जनावरांपेक्षा विदेशी जनावरांना जास्त प्रमाणावर होतो. 

    लाळ्या खुरकत रोग सामान्यतः प्राणघातक नसतो, परंतु दुधाचे उत्पादन कमी करणे, वजन कमी होणे आणि जनावरे व प्राणीजन्य पदार्थांच्या हालचालींवर निर्बंध यांमुळे लक्षणीय आर्थिक नुकसान होऊ शकते. गुरांमधील लाळ्या खुरकत रोग (FMD) रोगाबद्दल येथे काही प्रमुख मुद्दे आहेत:
  • लाळ खुरकतमुळे ताप: शरीराचे तापमान अचानक वाढणे हे लाळ खुरकत रोगाचे प्रारंभिक लक्षण आहे. 
  • लाळ खुरकतमुळे वेसिकल्स (द्रवांनी भरलेले फोड): प्राण्यांमध्ये जीभ, ओठ, हिरड्या आणि पायांच्या कोरोनरी बँडवर वेसिकल्स (द्रवांनी भरलेले फोड) विकसित होतात. हे फोड किंवा पुटिका फुटू शकतात, ज्यामुळे जखम  आणि अल्सर होऊ शकतात. वेसिकल्समुळे तोंडातून लाळ गळणे, खाणे-पिणे, रवंथ करणे मंदावणे, जिभेस चट्टे पडणे ही लक्षणे देखील दिसतात. 
  • लाळ खुरकतमुळे लंगडेपणा: पायांवर वेदनादायक जखमांमुळे, प्राणी लंगडे होऊ शकतात आणि हालचाल करण्यास आणि शेतीची कामे करण्यास नकार देतात. 
  • लाळ खुरकतचा संसर्ग: लाळ खुरकत (FMD) हा अत्यंत संसर्गजन्य आहे आणि संक्रमित आणि संवेदनाक्षम प्राण्यांच्या थेट संपर्कातून पसरू शकतो. उपकरणे, वाहने, कपडे आणि खाद्य यांसारख्या दूषित सामग्रीद्वारे देखील हा रोग पसरतो. तसेच कमी अंतरावर हवेतून प्रसारित सुद्धा होऊ शकतो. 
  • लाळ खुरकतचा मानवी आरोग्याचा धोका: लाळ खुरकत मानवी आरोग्यास थेट धोका देत नाही आणि मानवांना विषाणूची लागण होत नाही.

तोंडातून लाळ गळणे, खाणे-पिणे, रवंथ करणे मंदावणे, जिभेस चट्टे पडणे, पायाच्या खुरात जखमा होणे, जनावर लंगडणे ही सर्व लक्षणे लाळ्या खुरकूत रोगाची आहेत. तसेच जनावराला ताप येणे, जनावराची हालचाल मंदावणे व जनावर एकाच ठिकाणी थांबणे, दूध उत्पादनात अचानक घट होणे, तोंडातून फेस येणे, नाकपुड्या कोरड्या पडणे ही लक्षणेपण महत्त्वाची आहेत.  

लसीकरण हाच एकमेव रामबाण उपाय | Vaccination is the only cure

आयसीएआरने दिलेल्या माहितीनुसार देशातील ५२ कोटी ८० लाख पशुधन हे नेहमीच लाळ्या खुरकूतला बळी पडण्याच्या छायेत वावरत आहे. लाळ्या खुरकूत रोगामुळे भारतास दरवर्षी थेट २० हजार कोटींचा फटका बसत असून, अप्रत्यक्ष नुकसान तर त्याहूनही अधिक आहे. लाळ्या खुरकूतमुळे जनावरांची कार्यक्षमता घटणे, गाभण गायी व म्हशींचा गर्भपात होणे, वंध्यत्व -नपुंसकत्व येणे आणि या सार्‍यांमुळे दूध उत्पादन घट होणे असे नुकसानीचे चक्र सुरू राहते. हा आजार विषाणूजन्य असल्याने अतिशय झपाट्याने पसरतो आणि त्यावर खात्रीलायक असा औषधोपचार नाही. तरी पण काळजी घेतल्यास हा आजार लवकर बरा होतो व होणारे नुकसान टाळता येते. 

लाळ्या खुरकूत झाल्यावर जनावरांच्या तोंडातील आणि खुरातील जखमा पोटॅशियम परमॅगनेटच्या पाण्याने स्वच्छ करणे, आजार झालेल्या भागातील जनावरांचे बाजार थांबविणे, आजारी जनावरे वेगळी काढणे, दूध काढतांना स्वच्छता पाळणे, संसर्ग झालेले खाद्य जाळून टाकणे, गुरांचे गोठे पूर्णपणे निर्जंतुक करून घेणे, रोग झालेल्या भागातील जनावरे दुसरीकडे नेण्यास प्रतिबंध करणे असे अनेक उपाय लाळ्या खुरकूत रोगावर पशुवैद्यकांनी सुचविलेले आहे. परंतु रोग झाल्यावर तो बरा करण्यासाठी सुचविलेले उपाय हे खर्चिक आहेत, काही उपाय तर पशुपालकाच्या नियंत्रणाबाहेरचे आहेत, तरीपण हे उपाय केलेच तर रोग पूर्ण बरा झाल्यावर जनावर पूर्ण क्षमतेचे उत्पादन देईलच याबाबत कुठलिही खात्री राहत नाही. त्यामुळे रोग होऊच नये म्हणून लसीकरण हाच एकमेव रामबाण उपाय ठरला आहे.

    लाळ्या खुरकुत प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे साधन आहे. तथापि, विषाणूचे अनेक सेरोटाइप आणि उपप्रकार आहेत, ज्यामुळे लसीकरण आव्हानात्मक होते. विषाणूचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी क्वारंटाईन आणि योग्य स्वच्छता यासह कठोर जैवसुरक्षा उपाय आवश्यक आहेत.

लाळ्या खुरकुताची लस ही वर्षातून दोन वेळा जनावरांना द्यावी लागते. पहिली मात्रा सप्टेंबरमध्ये व दुसरी मात्रा मार्चमध्ये द्यायची असते. लाळ्या खुरकूतवर नियंत्रणासाठी सध्या भारतात दरवर्षी ३० कोटी ट्रायव्हॅलंट लसी तयार करण्यात येतात. लवकरच लाळ्या खुरकूतच्या नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम सरकार सुरू करणार आहे. तेव्हा आगामी तीन वर्षात या लशींची मागणी ६० ते ८० कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या लशींचा प्रभाव फक्त सहा महिन्यांकरिता राहतो. त्यामुळे वर्षातून दोनवेळा ही लस जनावरास द्यावी लागते. त्यामुळे लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही, कारण एकदा लस दिल्यावर सहा महिन्यांनी प्रत्येक जनावरास लस दिली जाईलच याची खात्री देता येत नाही, अनेक शेतकरी जनावरांना लस देण्यात गंभीर नसतात, म्हणून असे शेतकरी त्यांच्याकडील प्रत्येक जनावरास वर्षातून दोनवेळा आठवण ठेऊन लस देतीलच याची शंका येते. 

    अशा सर्व अडचणी लक्षात घेऊन आता अमेरिकेच्या सहकार्याने नवी लस विकसित करण्याच्या कामाला सरकार लागले आहे. ही लस वर्षातून एकदाच दिली तरी पुरेसी ठरणार आहे. बंगळूर येथील भारतीय लस संशोधन संस्था, अमेरिकेतील प्लम आयलंड पशुरोग निदान केंद्र आणि मुक्तेश्‍वर येथील अखिल भारतीय लाळ्या खुरकूत प्रतिबंध समन्वय प्रकल्प यांनी याबाबत सहकार्य करार केला असून ही नवी लस तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही नवी लस लाळ्या खुरकूतचा प्रसार करणार्‍या ऍडेनो व्हायरसवर मात करण्यास अधिक सक्षम असून ही लस सामान्य तापमानातही ठेवणे शक्य होणार आहे.

    काही प्रगत देशांनी जरी लाळ्या खुरकूतवर यशस्वी नियंत्रण मिळविलेले असलेतरीसुद्धा अनेक देश लाळ्या खुरकूतच्या चक्रात दरवर्षी सापडतात. या रोगाचा प्रसार वेगाने होतो. बर्ड फ्ल्यूग्रस्त कोंबड्यांप्रमाणे लाळ्या खुरकूतग्रस्त पशुधन नष्ट करणे हे भावनिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. भारतासारख्या देशात तर असा विचार अजिबात मान्य होणार नाही. 

निष्कर्ष ( Conclusion)-

पशुपालकांमध्ये लाळ्या खुरकूत रोगाबाबत जनजागृती करणे आणि पोलिओ निर्मूलन अभियानाप्रमाणे देशव्यापी लाळ्या खुरकूत निर्मूलन अभियान राबविणे हा एकच ठोस उपाय सरकारला योजावा लागेल. अमेरिकेशी सहकार्य कराराने वर्षातून एकदाच दिली जाणारी लस ( सिंगल शॉट) विकसित झाल्यास आणि सर्व राज्यांनी पोलिओ निर्मुलनाला जशी साथ दिली त्याप्रमाणे लाळ्या खुरकूत निर्मुलनाला साथ दिल्यास लाळ्या खुरकूतवर १०० टक्के विजय मिळविणे शक्य आहे.

Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने