कोऱ्या कागदाचे रहस्य | The secret of blank paper

blank-paper-secret
blank-paper-secret

कोऱ्या कागदाचे रहस्य 

The secret of blank paper

लिंबाचा रस आणि त्यात थोडे पाणी टाकून तयार होणाऱ्या द्रावणाचा शाई म्हणून उपयोग करून लिहिल्यास  कागदावर तो मजकूर दिसत नाही. मात्र जेव्हा हा कागद बल्बवर धरून त्याला उष्णता दिली तेव्हा कागदावरील द्रावणाचे ऑक्सीडेशन झाले आणि तपकिरी अक्षरे आपल्याला दिसतात. हे तंत्र वापरून आपण आपण गुप्त संदेश लिहू शकतो आणि संबंधित व्यक्ती या तंत्राने तो संदेश वाचू शकतो. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • कोऱ्या कागदावरची अदृश्य अक्षरे दिसू लागली
  • पो ए चोर का ?
  • न दिसणाऱ्या शाईचे रहस्य
  • अदृश्य शाईचे प्रकार 
  • निष्कर्ष

उद्योगपती सावंत यांना टपालाद्वारे पाकिटातून कोरे कागद मिळाले. हे कागद कोरे का? त्याद्वारे कुणालातरी काय संदेश द्यायचा आहे? कारखान्यात उत्पादीत मालाचीअफरातफर आणि त्यात पी.ए.चा सहभाग याचा शोध शाळेत शिकणारा आणि विज्ञानात हुशार असणारा जगत कसा लावतो, यासाठी पूर्ण गोष्ट वाचा.

जगतचे वडील आणि वडीलांचे उद्योगपती मित्र सावंत यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. संगणकावर बौद्धीक गेम खेळतांना जगतला ‘टपालद्वारे कोरे कागद’ हा शब्द दोन-तीन वेळा ऐकू आला, न राहवून जगतने त्यांच्या संवादात दखल देत याबाबत विचारले. खरे तर सावंत याबाबत खुलासा देऊ की नाही, या संभ्रमात होते. मात्र त्यांना जगतच्या सामान्य ज्ञानावर विशेषकइून विज्ञानाच्या ज्ञानाबाबत चांगली कल्पना होती. म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिले, 
‘‘ जगत, तू सायन्सचे चांगले ज्ञान बाळगतो, म्हणून तुला सांगतो. गेल्या महिन्यात मला साधारणपणे सात-आठ दिवसांच्या अंतराने टपालाद्वारे तीन पाकिटे मिळालीत, मात्र प्रत्येकवेळी पाकिटात कोरे कागदच मिळाले. माझा पी.ए. खरे तर माझे टपाल हाताळतो. तो सुद्धा याबाबत जास्त काही सांगू शकला नाही. त्यातील एक पाकिट आज माझ्या सोबतच आहे, तू ते बघ आणि त्यावरून काही निष्कर्ष काढता येतो का, मला सांग’’ असे म्हणत सावंतांनी एक पाकिट जगतच्या हातात दिले. पाकिटावर सावंतांच्या कारखान्याचा पत्ता स्पष्ट लिहिला होतो, आतील कागद मात्र खरोखरच कोरा होता. जगतने तो कागद खाली-वर करून,तिरपा-तारपा करून, प्रकाशाकडे करून अनेक वेळा न्याहळला. मात्र त्यालाही काही सूचत नव्हते. विचार करता करता जगतची आई लिंबू सरबत घेऊन आली आणि म्हणाली, ‘‘ जगत, तुझ्यासाठीही आणले आहे, पहिले ते घे आणि त्यानंतर कोऱ्या कागदावर संशोधन कर’’.

कोऱ्या कागदावरची अदृश्य अक्षरे दिसू लागली | Invisible letters on blank paper appeared

लिंबू सरबत संपवितांना जगतला अचानक काही तरी सूचले. त्याने टेबल लॅम्प सुरु केला आणि तीन-चार मिनिटांनी तो कोरा कागद त्या उष्ण झालेल्या टेबल लॅम्पच्या बल्ब वर काही अंतर ठेऊन धरला, बल्बची उष्णता कागदाला लागली आणि काही क्षणांनी कागदावर तपकिरी अक्षरे उमटायला सुरूवात झाली, कागद इकडे तिकडे करून थोड्याच वेळात कागदावरील सर्व मजकूर वाचता येण्याजोगा झाला. सर्वजण जगतचा का कार्यक्रम पाहून थक्क झालेत आणि नंतर उद्योगपती सांवत कागदावरील मजकूर वाचून आश्चर्यचकीत झाले. ते बघून जगतचे वडील म्हणाले,‘‘ सावंत फार गंभीर दिसताय, काय असे विशेष आहे, त्या कागदावरील मजकुरामध्ये’’ 
‘‘ या मजकुरामध्ये असे लिहिले आहे की आमच्या कारखान्यात उत्पादित होणाऱ्या काही मालाची अधिकृतपणे नोंद न करता काही लोक परस्पर विक्री करतात, मात्र यात कुणाचेही नाव लिहिलेले नाही, आता त्यांना कसे ओळखणार’’ सावंत चिंतातूर होऊन म्हणाले. 
‘‘ काका, चिंता करू नका, सर्व नाही, मात्र एक चोर हमखास सापडला आहे, तो म्हणजे तुमचा पी.ए.’’ जगतने मध्येच त्याचे मत मांडले. सावंतांना जगतच्या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही, ते लगेच म्हणाले, ‘‘ हे तू खात्रीने कसे सांगू शकतो’’? 

 पो ए चोर का ? | Why P.A. is a thief ?

‘‘ सोप आहे, कारण तुमचे टपाल तुमचा पी.ए. प्रथम वाचतो आणि नंतर तुम्हाला सादर करतो, हे टपाल पाठविणाऱ्या तुमच्या प्रामाणिक कर्मचाऱ्याला माहीत होते, म्हणून त्याने तुम्हाला विशिष्ट पद्धतीने पत्र लिहून पाठविली, जेणे करून त्या कोऱ्या टपालाचे रहस्य पी.ए.ला समजणार नाही आणि तुमच्यापर्यंत ते टपाल विनाअडथळा पोहचू शकेल आणि नंतर तुम्ही कुणाच्यातरी सल्ल्याने त्यावर निष्कर्ष काढू शकाल, जसा आज तुम्ही तो माझ्याद्वारे काढला, त्या प्रामाणिक कर्मचाऱ्याने जर नेहमीप्रमाणे मजकूर लिहून टपाल पाठविले असते तर तुमच्या पी.ए.ने ते टपाल तुमच्या पर्यंत पोहचूच दिले नसते, कारण तो पण मालाच्या परस्पर विक्रीतील गेैरव्यवहारात सामील होता ’’ जगतचे स्पष्टीकरण ऐकून सर्वांना जगतचे कोैतूक वाटले. मात्र सावंतांचे समाधान झाले नाही, त्यांनी प्रश्‍न विचारलाच, ‘‘ जगत तुझे म्हणणे पटते, पण कोरा कागद बल्बवर उष्ण करून त्यावर अक्षरे उमटण्याचे स्पष्टीकरण तू अजून दिले नाही ’’ 

न दिसणाऱ्या शाईचे रहस्य | The secret of invisible ink 

‘‘ न दिसणारी शाई बनवून लिहीणे, यामागे फार मोठे रहस्य नाही, ते अगदी सोपे आहे. थोडासा लिंबाचा रस आणि त्यात थोडे पाणी टाकून आणि हे द्रावण ढवळून चांगले एकजीव करावे, या द्रावणाचा नेहमीच्या शाई ऐवजी उपयोग करावा, म्हणजे हे द्रावण फाऊंटन पेनात भरावे किंवा उदबत्तीच्या काडीच्या टोकाला थोडासा कापूस गुंडाळून ते टोक वांरवार या द्रावणात बुडवून लिहावे. या द्रावणाने लिहिलेला मजकूर कागदावरील द्रावण सुकल्यावर अजिबात दिसत नाही, मात्र जेव्हा हा कागद बल्बवर धरून त्याला उष्णता दिली तेव्हा कागदावरील द्रावणाचे ऑक्सीडेशन झाले आणि तपकिरी अक्षरे आपल्याला दिसली. आईने जेव्हा लिंबू सरबत आणले, तेव्हा माझ्या मनात लिंबूचा हा गुणधर्म सूचला, खरे तर आईच्या लिंबू सरबतामुळेच हे रहस्य उलगडले.’’ जगतचे उत्तर र्एकून सर्वांचे समाधान झाले आणि हे रहस्य उलगडण्यामागे आईचा मोठा हातभार लागला हे ऐकून सर्वांना जगतचे कोैतूक वाटले. 

अदृश्य शाईचे प्रकार | Types of invisible ink

लिंबाच्या रसापासून अदृश्य शाई कशी कार्य करते याबाबत जगतने सांगीतलेले रहस्य आपणास समजले असेलच, पण केवळ लिंबाच्या रसापासूनच न दिसणारी शाई तयार करता येते, असे नव्हे. खालील विविध प्रकारेही अदृश्य शाई तयार करता येते. 

  • दुधापासून अदृश्य शाई : दूध अदृश्य शाई म्हणून वापरले जाऊ शकते. दुधासह लेखन किंवा रेखाचित्र सुरुवातीला अदृश्य होईल. संदेश उघड करण्यासाठी, कागद हलक्या हाताने गरम करा. उष्णतेमुळे दुधाची प्रथिने तपकिरी होतात, ज्यामुळे संदेश आपणास सहजतेने वाचता येतो. 
  • बेकिंग सोडा आणि द्राक्षाचा रसापासून अदृश्य शाई :  बेकिंग सोडा आणि द्राक्षाचा रस यांचे मिश्रण अदृश्य शाई तयार करण्यासाठी वापरता येते.  द्राक्षाच्या रसामध्ये बेकिंग सोडासह प्रतिक्रिया देणारे संयुगे असतात, ज्यामुळे मिश्रण सुकल्यावर रंग बदलतो. पेपर गरम झाल्यावर संदेश वाचता येतो. 
  • अदृश्य शाई पेन: अदृश्य शाई पेन दुकानात उपलब्ध झालले आहेत, अशा संयुगे वापरतात जे सामान्य प्रकाशात अदृश्य असतात परंतु अतिनील प्रकाशावर प्रतिक्रिया देतात. कागदावर अतिनील प्रकाश येईपर्यंत, संदेश उघड होईपर्यंत अशा पेनने लिहिणे अदृश्य रहाते. 
  • अदृश्य शाईसाठी यूव्ही किंवा ब्लॅकलाइट मार्कर: यूव्ही किंवा ब्लॅकलाइट मार्करमध्ये अशा शाई असतात ज्या सामान्य प्रकाशात अदृश्य असतात परंतु अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किंवा ब्लॅकलाइटच्या संपर्कात आल्यावर दृश्यमान होतात. ही पद्धत सामान्यतः सुरक्षिततेसाठी वापरली जाते.
  • अदृश्य शाईसाठी लोह सल्फेट आणि पाणी: लोह सल्फेट आणि पाण्याचे द्रावण अदृश्य शाई म्हणून वापरले जाऊ शकते. या सोल्यूशनसह लिहिणे अदृश्य दिसते आणि उष्णतेच्या संपर्कात आल्यावर संदेश दृश्यमान होतो.

निष्कर्ष ( Conclusion)-

अदृश्य शाई  सामान्य प्रकाश परिस्थितीत दृश्यमान नसतात परंतु विशिष्ट पद्धती वापराद्वारे प्रकट केले जाऊ शकतात. गुप्त संदेश, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि मनोरंजनासह विविध कारणांसाठी अदृश्य शाईचा वापर केला गेला आहे. हेरगिरी संदर्भांमध्ये अदृश्य शाई वापरण्याचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. अदृश्य शाईचा वापर जबाबदारीने करायला हवा. अदृश्य शाईने लिहिलेल्या मजकुराला कायदेशीर मान्यता आहे की नाही याबाबत वकिलांचा सल्ला घ्यावा.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे

-------------------------------------
Image Source- blur-close-up-composition-craft-281962 Photo by John-Mark Smith from Pexels ( image modified)

---------------------------------
हे सुद्धा वाचा-
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने