गच्चीवरील शेती उपयुक्त | Terrace farming is useful

Terrace farming is useful
Terrace-gardening

गच्चीवरील शेती उपयुक्त 

छतावर शेती करणे म्हणजे रूफटॉप फार्मिंग किंवा रूफटॉप गार्डनिंग. ही एक प्रथा आहे ज्यामध्ये इमारतींच्या छतावर झाडे लावली जातात. शहरी शेतीचा हा प्रकार दाट लोकवस्तीच्या भागात लोकप्रिय झाला आहे आणि ते अनेक फायदे देते. सर्वसाधारणपणे घरांभोवती जागा असणारी व्यक्ती मग शहरातील असो की, ग्रामीण भागातील असो तो परसबागेचा विचार करतो. परंतु सध्या फ्लॅट संस्कृतीमुळे जागेअभावी परसबाग तयार करणं हे शहरातील लोकांना शक्य राहिलेले नाही. ज्या लोकांच्या घराभोवती थोडीफार जागा होती, तेथील जागेचा वापर परसबागेएवेजी आता गाडी पार्किंग करण्यासाठी होत आहे. शहरातील लोकांना स्वत: पिकविलेला भाजीपाला, स्वत:च्या देखरेखीत वाढविलेली फुले आता मिळतील कशी आणि त्यावर काय पर्याय आहे का, असा प्रश्न नेहमीच शेतीतज्ञांना विचारला जात होता. शेतीतज्ञांनी आता त्यावर पर्याय म्हणून गच्चीवरील शेती हा पर्याय शोधला असून त्याद्वारे अनेक लोकांनी यशस्वी शेती केली आहे. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 
  • गच्चीवरील शेतीचे प्रकार
  • गच्चीवरील शेतीसाठी माती
  • गच्चीवरील शेती करतांना स्लॅबची काळजी
  • गच्चीवरील शेतीत पावसाची भूमिका
  • गच्चीवरील शेतीसाठी पिकांची निवड
  • गच्चीवरील शेतीचे कीड नियंत्रण- जैविक किटकनाशकांचा उपयोग
  • गच्चीवरील शेतीचे फायदे
  • गच्चीवरील शेतीला पर्याय
  • गच्चीवरील शेती करतांना भाज्यांची अदलाबदल- भाजी क्लब
  • गच्चीवरील शेतीमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थामध्ये सुधारणा
  • निष्कर्ष

गच्चीवरील शेतीचे प्रकार | Types of terraced farming

खरंतर गच्चीवरील शेतीचे ढोबळमानाने तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल. गच्चीवर सरळ माती टाकून आणि वाफे बनवून शेती करणे, गच्चीवर वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये शेती करणे आणि गच्चीवर काही ठिकाणी माती टाकून वाफे व काही ठिकाणी कुंड्यांमध्ये शेती करणे. म्हणजे तिसऱ्या प्रकारात पहिले दोन्ही प्रकार एकाचवेळी जागेच्या उपलब्धतेनुसार उपयोगात आणले जातात. 

गच्चीवरील शेतीसाठी माती | Soil selection for terrace farming 

गच्चीवरील शेतीच्या पहिल्या प्रकारात गच्चीवर माती टाकण्यापासून सुरूवात होते. त्यासाठी गाळाची माती अतिशय उत्तम असते. अशी माती गच्चीवर पसरतांना त्यामध्ये शेणखत, गांडूळखत मिसळावे. गच्चीवरील शेतीसाठी सहा ते आठ इंचाचा मातीचा थर पुरेसा ठरतो. त्यानंतर आपल्याला आवडणारी फळझाडे, फुलझाडे किंवा औषधी वनस्पती यांची लागवड करावी. या रोपांची लागवड केल्यानंतर त्यांना वेळेवर पाणी आणि खतांचा पुरवठा करावा. यामुळे एकदम उत्तम प्रकारे शेती फुलविता येते. 

गच्चीवरील शेती करतांना स्लॅबची काळजी | Care of slabs when cultivating on terraces 

गच्चीवर माती टाकून शेती करतांना स्लॅबच्या सुरक्षेविषयी काळजी सर्वात प्रथम घेतली पाहिजे. त्यासाठी इंजीनिअरचा सल्ला घ्यावा. गच्चीचे वॉटरप्रूफींग केलेले नसल्यास ते करून घ्यावे. तरीसुद्धा स्लॅबच्या सुरक्षेविषयी चिंता असल्यास उच्च दर्जाचा पॉलीथीन पेपर खाली अंथरून त्यावर माती टाकून वाफे बनवावे. अशा प्रकारे वाफे बनविल्यास अणकुचीदार अवजारे वापरू नये, अन्यथा पॉलीथीन कापड फाटू शकते. 

गच्चीवरील शेतीत पावसाची भूमिका | The role of rain in terraced farming

पहिल्या प्रकारच्या गच्चीवरील शेतीसाठी जोऱ्यात आलेला पाऊस फारच धोकेदायक असतो. यामुळे पावसाच्या पाण्यात वाफ्यातील माती मिसळून माती वाहून जाऊ शकते किंवा मातीतील पोषक अन्नद्रव्ये वाहून जाऊ शकतात. त्यासाठी वाफ्याला शेडनेटचे संरक्षण देऊन पावसाचा प्रभाव काही अंशी कमी करता येतो. गच्चीला शेड केलेले असल्यास पावसाचा फार धोका रहात नाही. गच्चीवर कुंड्यामध्ये भाजीपाला लावणे हा प्रकार तसा जुनाच आहे. परंतु कुंड्या वापरतांना त्याची फार देखभाल करावी लागते. त्यांची माती बदलावी लागते. त्या तुलनेत वाफ्यातील शेती केव्हाही सुलभ ठरते. 


Ridge gourd terrace farming
Ridge gourd

गच्चीवरील शेतीसाठी पिकांची निवड | Selection of crops for terraced farming 

गच्चीवरील शेतीत भेंडी, गवार, दोडकी, कारली, गाजर, वाटाणा, कोथींबीर, वांगी, मिरची, पालक, मेथी अशा भाज्यांची लागवड करता येते. तसेच काही औषधी वनस्पतींची लागवड जसे पुदीना, गवती चहा, कढीपत्ता, शतावरी, अळू सुद्धा सहज शक्य आहे. गच्चीवरील शेतीची सुद्धा जमिनीवरील शेतीप्रमाणे काळजी घ्यावी लागते. 

Tulas medicinal plant
Tulasi

गच्चीवरील शेतीचे कीड नियंत्रण- जैविक किटकनाशकांचा उपयोग | Pest Control - Use of Organic Pesticides 

कीड व रोगांपासून अशा शेतीचा बचाव करण्यासाठी रासायनिक किटकनाशके वापरणे टाळावे. त्याऐवजी जैविक किटकनाशकांचा उपयोग करावा. दशपर्णी अर्क, लसून-मिरची अर्क, आले-लसूण अर्क, तंबाखूचा अर्क असे अनेक उपाय कीडनियंत्रणासाठी करता येऊ शकतात. अगदी दुसरा पर्यायच नसेल आणि जैविक कीटकनाशकांमुळे कीड नियंत्रणात येत नसेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशके फवारावीत. 

गच्चीवरील शेतीचे फायदे | The benefits of terraced farming

ताज्या फळभाज्या, पालेभाज्या मिळण्याचे दिवस आता संपले आहेत. पेट्रोलप्रमाणेच भाज्यांच्या किमती गगनाला भिडत आहेत. गच्चीवरील शेतीमुळे अशा भाज्या अतिशय ताज्या स्वरूपात आणि त्यासुद्धा एकदम कमी खर्चात मिळविता येतात. एकदा स्वत:च्या शेतातील भाजी खायची सवय झाली की मग बाजारातील भाजी शिळी, कमी दर्जाची वाटू लागते. तसेच सध्या भाजीपाल्यात आढळणारे रासायनिक किटकनाशकांचे अंश आणि रासायनिक खतांचे अंश ही समस्या अतिशय गंभीर बनली आहे. काही भाज्यांवर तर इतकी फवारणी केलेली असते की त्या विषारी बनल्या असतात. शिवाय रासायनिक किटकनाशकांची फवारणी केल्यावर विशिष्ट दिवसांनंतरच भाजीपाला विक्रीस आणायचा नियम असतांनासुद्धा तो नियम पाळण्यासंदर्भात कुणीही गंभीर दिसत नाही. म्हणून ताजा, स्वस्त आणि सुरक्षित भाजीपाला ही गच्चीवरील शेतीची मोठी देणगी आहे. गच्चीवरील शेतीचे तसे इतर अनेक फायदेसुद्धा दिसून आले आहेत. अशा शेतीमुळे प्रदूषण कमी होते, मनाची प्रसन्नता वाढते. शेतीतील काम केल्यामुळे व्यायामही होतो. शिवाय गच्चीवरील शेती आता एक छंद प्रकार म्हणून सुद्धा विकसित होत आहे. घरातील केरकचऱ्याचा उत्तम प्रकारे या शेतीत उपयोग करता येतो. केळीची साले, धान्याचा कोॅडा, पालेभाज्यांच्या मुळ्या, फळांच्या साली ज्या आपण नेहमी फेकून देतो, त्या सर्वांचा गच्चीवरील शेतीत सेंद्रीय खत म्हणून उपयोग करता येतो. 

गच्चीवरील शेतीला पर्याय | Alternatives to terraced farming 

गच्चीवरील शेती ही गच्चीवरच केली पाहिजे असे नव्हे, अशी शेती बाल्कनीत सुद्धा केली तरी चालते. मात्र त्या ठिकाणी किमान चार ते पाच तास सुर्यप्रकाश पडायला हवा. अन्यथा झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होणार नाही.

गच्चीवरील शेती करतांना भाज्यांची अदलाबदल- भाजी क्लब | Vegetable exchange while farming on the terrace - Vegetable Club 

काही शहरांमध्ये अनेक लोकांनी गच्चीवरील शेती यशस्वी केली आहे. त्यांनी या शेतीला आता एक वेगळेच वळण दिले आहे. कारण गच्चीवरील शेतीची अतिशय कमी जागेची उपलब्धता ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे प्रत्येकजण सर्व प्रकारच्या भाज्या अशा छोट्याशा जागेत लावू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून शहरातील काही लोकांनी एकमेकांकडून भाज्यांची अदलाबदली सुरू केली आहे. म्हणजे आपल्या गच्चीवरील शेतात आपली गरज भागवून उरलेली भाजी शेजारच्या घरी देऊन त्यांच्याकडून तेथील भाजी अदलाबदल करणे. त्यामुळे शहरातील काही लोकांचा अशा प्रकारचा एक क्लबच बनला आहे. भाजीच्या बदल्यात भाजी हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. 

Terrace farming improve mental health
Farming with family

गच्चीवरील शेतीमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थामध्ये सुधारणा: जनरेशन गॅप कुटूंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद | Family Farming

गच्चीवरील शेतीमुळे केवळ शारीरिक स्वास्थालाच फायदा मिळतो असे नसून त्यामुळे मानसिक स्वास्थावर देखील खूप चांगले परिणाम दिसून येतात. सध्या जनरेशन गॅपमुळे दोन पिढीमंध्ये अजिबात जमेनासे झालेले आहे, शरीराने सर्व कुटूंब एकत्रित राहतांना दिसत असले तरी कुणाचेही एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे सासू-सून, बाप-बेटा यांच्यामध्ये कधीही सुंसंवाद दिसत नाही. काही कुटंबांचे अशा कौंटूंबिक कलहामुळे मानसिक स्वास्थ इतके हरवून जाते की त्यांना मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. अशावेळी जर अशा कुटूंबाने गच्चीवरील शेतीला सुरूवात केली तर त्यांच्या कुंटूंबामध्ये असे काही बदल होतील की मानसिक स्वास्था संबधी तेथील समस्या कमी व्हायला सुरूवात होतील. गच्चीवरील शेतीची कामे करतांना कुटूंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद वाढेल, घरातील लहान मुलांची मातीशी मैत्री वाढेल आणि जेव्हा अशा शेतीतील भाजी स्वयंपाकगृहात पहल्यांदा शिजेल आणि सर्वांच्या ताटात येईल तेव्हा अनेक वर्षांपासून असलेला दुरावा नष्ट होउन कुटूंबातील सर्व सदस्य हसतखेळत जगण्यास सुरूवात करतील. तसेच अशा भाज्या स्वच्छ, सुरक्षित, रासायनिक पदार्थांचे अंशरहित असल्यामुळे त्याची पौष्टीकता शरीराला मिळाल्यावर मनावरील ताणतणाव बऱ्याचअंशी कमी होतात, असे अनेक विचारवतांचे म्हणणे आहे. 

निष्कर्ष ( Conclusion)-

वरील विवेचनावरू आता स्पष्ट झालेच आहे की गच्चीवरील शेती अत्यंत सहज, सोपी, कमी खर्चात होणारी आणि शारीरिक स्वास्थासोबत मानसिक स्वास्थ जपणारी गच्चीवरील शेती प्रत्येकाने सुरू करायला हवी. छतावरील शेतीचे अनेक फायदे असले तरी, त्यात संरचनात्मक विचार, वजन मर्यादा आणि योग्य सिंचन व्यवस्थापन यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. यशस्वी छतावरील शेतीसाठी शहरी शेतीमध्ये शाश्वतता आणि लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन, योग्य पायाभूत सुविधा आणि सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे

photo source- 4th photo -Photo by AnnaEarl on Unsplash

---------------------------------
हे सुद्धा वाचा-
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने