पाणी परीक्षण सुद्धा महत्त्वाचे | Water Testing is Important

Water Testing is Important
water-testing

पाणी परीक्षण सुद्धा महत्त्वाचे

स्वातंत्रोत्तर काळात भारतातील नद्यांवर मोठमोठी धरणे बांधली गेली. देशाची सिंचन क्षमता १० ते १२ टक्क्यापासून साधारणत: २५ ते २८ टक्क्यापर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे काही भागात प्रमाणापेक्षा जास्त पाणी उपलब्ध झाले. परिणामी मध्यम काळ्या तसेच काळ्या जमिनीत पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, पाण्याचे प्रति विषयक अज्ञान, कालव्यांचे सदोष व्यवस्थापन , पाणी वाटपात शेतकर्‍यांकडून होणारी अनास्था यामुळे जमिनी क्षारयुक्त बनल्या. मुख्यत्वे पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस पिकविणार्‍या, चिकणमाती असणार्‍या जमिनीत ही समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहे. तसेच शेतीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सध्या होऊ लागला आहे. मात्र त्यामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. शेतीचे हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीच्या परीक्षणासोबत पाण्याचं परीक्षण करणं गरजेचे झाले आहे.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 
  • सिंचनासाठी पाण्याची चाचणी का करावी?
  • पाण्याची चाचणी ही काळाची गरज
  • क्षारयुक्त पाणी आणि ठिबक सिंचन
  • पाण्याचा नमुना असा घ्या
  • निष्कर्ष

सिंचनासाठी पाण्याची चाचणी का करावी? | Why test irrigation water?

सिंचनासाठी पाण्याची चाचणी महत्त्वपूर्ण आहे कारण शेतीमध्ये वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या गुणवत्तेचा पीक वाढ, मातीचे आरोग्य आणि एकूण कृषी उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. सिंचनासाठी पाण्याची चाचणी का आवश्यक आहे याची अनेक कारणे येथे आहेत:

  • पाण्यातील क्षारता:  सिंचनाच्या पाण्यात क्षारांच्या उच्च पातळीमुळे जमिन खारट होऊ शकते, ज्यामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होतो आणि पीक उत्पादनात घट होते. जमिनीत क्षार जमा होण्यापासून रोखण्यासाठी पाण्याची चाचणी पाण्याच्या क्षारतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते.
  • सोडियम सामग्री (Sodium Content) : पाण्यातील सोडियमची पातळी वाढल्याने मातीची सोडीसिटी ( sodicity) होऊ शकते, ज्यामुळे मातीची रचना आणि पारगम्यता (permeability) प्रभावित होते. मातीची झीज रोखण्यासाठी नियमित पाणी चाचणी सोडियम पातळी ओळखण्यास मदत करते.
  • pH पातळी: सिंचनाच्या पाण्याचा pH महत्त्वाचा आहे कारण त्याचा जमिनीतील पोषक उपलब्धतेवर परिणाम होतो. खूप अम्लीय किंवा खूप अल्कधर्मी असलेले पाणी आवश्यक पोषक घटकांच्या विद्राव्यतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होतो.
  • अन्नद्रव्य पातळी: पाण्याची चाचणी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यासारख्या आवश्यक पोषक घटकांचे प्रमाण निश्चित करण्यात मदत करते. खतांचा वापर समायोजित करण्यासाठी आणि पिकांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील याची खात्री करण्यासाठी ही चाचणी उपयुक्त आहे. 
  • सूक्ष्मजीव प्रदूषण (Microbial Contamination) : पिकांना हानी पोहोचवणाऱ्या जलजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी  पाण्यातील जिवाणू आणि बुरशी यासारख्या सूक्ष्मजीव दूषित घटकांची चाचणी करणे आवश्यक आहे.
  • जलजन्य रोगजंतू (Waterborne pathogens) :  काही जलस्रोतांमध्ये जलजन्य रोगजंतू असतात जे वनस्पती आणि प्राणी दोघांनाही प्रभावित करू शकतात. पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रोगांचा प्रसार रोखण्यासाठी रोगजंतूची चाचणी करणे महत्त्वपूर्ण आहे.
  • पाणी गुणवत्ता मानके (Water Quality Standards) : बर्‍याच प्रदेशांनी सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता मानके स्थापित केली आहेत आणि शाश्वत कृषी पद्धती राखण्यासाठी या मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित पाणी चाचणी या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यात मदत करते.
  • कार्यक्षम पाणी व्यवस्थापन:  सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता समजून घेतल्याने शेतकऱ्यांना कार्यक्षम पाणी व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करता येतो. उदाहरणार्थ, पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास, शेतकरी अधिक क्षार सहन करणारी पिके निवडू शकतात किंवा जमिनीतून क्षार बाहेर टाकण्यासाठी उपाययोजना करू शकतात.
  • पिकांचे नुकसान रोखणे:  निकृष्ट-गुणवत्तेच्या पाण्यामुळे जमिनीत हानिकारक पदार्थ साचतात, ज्यामुळे पिकांचे दीर्घकालीन नुकसान होते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. अपरिवर्तनीय नुकसान होण्यापूर्वी संभाव्य समस्या ओळखण्यात पाणी चाचणी मदत करते.
  • पीक उत्पन्न अनुकूल करणे:  पाण्याची गुणवत्ता समजून घेऊन, शेतकरी सिंचन वेळापत्रक, पीक निवड आणि खतनिर्मितीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे इष्टतम पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
नियमित पाणी चाचणीमुळे शेतकऱ्यांना सिंचन पद्धती, पोषक व्यवस्थापन आणि पीक निवडीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित निरीक्षण हा आधुनिक शेती पद्धतींचा अविभाज्य भाग आहे.

पाण्याची चाचणी ही काळाची गरज | Water testing is the need of the hour

वनस्पतीच्या पेशीमध्ये ९५ टक्केपेक्षा जास्त पाणी असते. प्रत्येक झाडाला १ किलो शुष्क पदार्थ तयार करण्यास सुमारे ४०० किलो पाणी लागते. वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी महत्त्वाची अन्नद्रव्ये प्रथम जमिनीतल्या पाण्यामध्ये विरघळून योग्य विद्युतभारीत स्वरूपात झाल्यावर वनस्पती शोषून घेतात. पाणी जर कमी असेल तर वनस्पती वाढीच्या सर्व प्रक्रिया मंद होतात. त्याचबरोबर उत्पादन घटते आणि प्रमाणापेक्षा जास्त झाले तर पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. खरंतर झाडांची मुळे परिसरण दाबामुळे जमिनीतील पाणी शोषतात. पेशीत असलेल्या पाण्याच्या व जमिनीतील पाण्याच्या क्षारतेच्या तीव्रतेवर परिसरण दाब अवलंबून असतो. पेशीतील पाण्यात क्षारता जास्त असेल तर झाड जास्त पाणी शोषते व बाहेरच्या जमिनीत क्षारमय जास्त पाणी असेल तर झाड कमी पाणी शोषते. तसेच पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले की जमिनीची घडण बिघडते. पाण्याचा निचरा कमी होउन पाण्याची जमिनीमध्ये पातळी वाढते. त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा जमिनी चोेपण होऊन जमिनीच्या सामूवर वाईट परिणाम होतो. जमिनीचे आरोग्य बिघडते आणि त्याचा पीक उत्पादनावर वाईट परिणाम होतो, जमीन नापिक होते. 

     बर्‍याच ठिकाणी पाणी खारट व मचूळ असल्याने त्याचा जमिनीवर आणि पिकावरही अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून पाणी परीक्षण करून घेणे अत्यावश्यक बनले आहे. सिंचनासाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याची प्रत कोणती, पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्षार कमी अधिक प्रमाणात आहेत इत्यादी प्रश्‍नांच्या उत्तरासाठी सिंचनाद्वारे वापरण्यात येणार्‍या पाण्याची चाचणी करून प्रत पाहणे ही काळाची गरज बनली आहे. कारण सध्या सिंचनासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचे दुष्परिणाम वनस्पतीच्या वाढीवर, जमिनीच्या गुणधर्मांंवर तसेच उत्पादनक्षमतेवर दिसू लागले आहेत. सिंचनासाठी पाण्याचा वापर करत असताना ह्या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाटबंधारे प्रकल्पातील जमिनी क्षारयुक्त होत आहेत. परिणामत: जमिनीची उत्पादनक्षमता कमी होत चालली असल्यामुळे का होईना, आता शेतकरी बंधू माती परीक्षणासोबत पाणी परीक्षणाचाही विचार करू लागले आहेत. 

    आता शेतकरी शेतात पाण्याच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर करतांना विशेष काळजी घ्यायला लागले आहेत. पाण्याविना दुष्काळ पडतो तर अतिपाण्याने शेती बुडते, हे तत्त्व त्यांना पटले आहे. आपण ज्या शेतीतून पिढ्यानपिढ्या उत्पादन घेत आहोत, त्या शेतीचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असून या काळ्या आईला दीर्घायुषी ठेवण्यासाठी माती परीक्षणासोबत पाणी परीक्षणाकडेही शेतकरी मोठ्या संख्येने वळत आहेत.

क्षारयुक्त पाणी आणि ठिबक सिंचन | Saline water and drip irrigation

खराब पाण्यामुळे केवळ जमिनीचे आरोग्य बिघडते असे नव्हे तर, त्यामुळे अनेक वेगळे दुष्परिणामसुद्धा आढळतात. सध्या आपले राज्य ठिबक सिंचनात अग्रेसर आहे. क्षारयुक्त पाणी सिंचनात वापरल्यास ठिबक संचातील पाणी पुरवणार्‍या बारीक नळ्यांमध्ये क्षार एकवटून पाणी वाहकतेस अडथळा उत्पन्न करतात. म्हणून ठिबक सिंचन संच बसवितांनाही पाण्याची प्रत तपासणे गरजेचे बनले आहे, जेणेकरून क्षारयुक्त पाणी वापरतांना योग्य ती काळजी घेता येऊ शकेल.

पाण्याचा नमुना असा घ्या | Take a water sample like this

ज्या प्रमाणे मातीचा नमुना तो कसा घ्यावा याबाबत विशिष्ट नियम असतात, त्याचप्रमाणे पाण्याचा नमुना घेण्यासाठीही विशेष काळजी घ्यावी लागते. सिंचनासाठी पाण्याचे परीक्षण करण्यासाठी जो पाण्याचा नमुना घेतला जातो, तो नदीच्या पाण्याचा असो वा विहिरीतील पाण्याचा, तलावातील असो की कालव्यातील असो तो प्रातिनिधीक असणे फार गरजेचे असते. पाण्याचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ काचेची अथवा प्लास्टीकची बाटली घ्यावी. परीक्षणासाठी साधारण ७५० ते १००० मिलिलिटर पाणी घ्यावे. नदी, ओढे आणि कॅनॉल यांच्या वाहत्या पाण्यामधील मध्य भागातील नमुना घ्यावा. नदीतील पाणी किंवा तलावातील पाण्याचा नमुना घेताना लांब बांबुच्या टोकाला दोरीच्या साहाय्याने लहान बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घ्यावा. त्याबरोबर ट्यूबवेल आणि विहिरीमधील नमुना पंप सुरू करून १५ ते ३० मिनिटे झाल्यावर घ्यावा. नमुना घेतलेल्या बाटलीवर शेतकर्‍याचे नाव, पूर्ण पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख आणि थोडक्यात त्या पाण्याबाबतचे शेतकर्‍यांचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत नमुना जमा करावा. पाण्याचा नमुना घेतल्यानंतर ४८ तासाच्या आत प्रयोगशाळेत पोहोचेल याची खबरदारी घ्यावी. अन्यथा , पाण्यात विशिष्ट भौतिक, रासायनिक किंवा जैेविक बदल घडण्याची शक्यता असते.

परीक्षण करतांना पाण्यातील कार्बोनेट्‌स, बायकार्बोनेटस्, सोडियम, कॅल्शीयम आणि मॅग्नेशियम यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण, रेसिड्यूल सोडिअम कार्बोनेट विनिमयात्मक सोडिअम टक्केवारी, सोडिअम अधिशोषित गुणोत्तर, बोरॉन, नायट्रेट, लिथीअम, सेलेनियम, फॉस्फेट्‌स, कोबाल्ट इत्यादीच्या प्रमाणावरून पाण्याची प्रत ठरवली जाते. उत्तम प्रत असलेले पाणी सर्व प्रकारच्या जमिनीला तसेच वेगवेगळ्या पिकांना देता येते. त्याचबरोबर मध्यम प्रतीचे पाणी हलक्या जमिनीस चांगले असून, मध्यम आणि भारी जमिनीस द्यायचे असेल तर जमिनीतून चर खोदून पाण्याचा निचरा करून सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. परीक्षणानंतर पाण्याची प्रत समजल्यावर पिकांचे नियोजन करता येते. त्यानुसार पाण्यातील क्षारांच्या प्रमाणानुसार आणि पिकांच्या क्षार सहनशक्तीनुसार वेगवेगळी पिके निवडता येतात.

संत्री, मोसंबी, कोबी, उडीद, मूग, हरभरा, वाटाणा, घेवडा, भेंडी, चवळी ही पिके क्षारयुक्त पाणी सहन करू शकत नाहीत. गहू, ज्वारी, बाजरी, लसूण, मका, भात, ऊस, करडई, फुलकोबी, रताळी, कांदा, बटाटा ही पिके मध्यम क्षारयुक्त पाणी सहन करणारी आहेत. तर कापूस, ताड, माड, सुपारी, ताग, धैंच्या, पेरू, ओट, बारली ही जास्त क्षारयुक्त पाणी सहन करणारी पिके आहेत.
क्षारयुक्त पाणी क्षारयुक्त जमिनीत वापरताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. जमीन चोपण असल्यास पेरणीनंतर चांगल्या उगवणीसाठी क्षारयुक्त पाणी तुषार सिंचनाने देणे, चांगले पाणी क्षारयुक्त पाण्यात मिसळून देणे, क्षारपड जमिनीत निचर्‍याची उघड्या किंवा भूमिगत छिद्रांचा पाईप टाकून व्यवस्था करणे, जमिनीत प्रती हेक्टरी ३० ते ४० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत अथवा धैंचा या हिरवळयांच्या खताचा वापर करणे, फेरपालटीबाबत आणि पिक लागवडीबाबत कृषी विद्यापीठांच्या शिफारशी अभ्यासणे तसेच जमीन चोपण असल्यास जिप्सम/गंधक/आयर्न पायराईट या भुसुधारकांचा वापर जमीन सुधारणेसाठी शेणखतातून करणे अशी विशेष काळजी घेतल्यास क्षारयुक्त पाणी क्षारयुक्त जमिनीत वापरता येेते.

निष्कर्ष ( Conclusion)-

कृषी विद्यापीठे आणि कृषि विभागाच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांमुळे आता शेतकरी माती परीक्षण थोडे गांभीर्याने घेऊ लागले आहेत. अशा शेतकर्‍यांनी पाणी परीक्षणाचेही महत्त्व समजून घेतल्यास आणि पाण्याच्या परीक्षणानुसार पीक नियोजन केल्यास निश्‍चित फायदा होईलच आणि त्यासोबत जमिनीची प्रत आणखी बिघडू नये, याबाबत बंदोबस्तही करता येईल. म्हणून शेतकर्‍यांनी मातीपरीक्षणासोबत पाणी परीक्षणालाही महत्त्व देणे आता गरजेचे बनले आहे.

- योगेश रमाकांत भोलाणे

Photo source- Photo by RephiLe water on Unsplash
पाणी परीक्षण सुद्धा महत्त्वाचे | Water Testing is Important पाणी परीक्षण सुद्धा महत्त्वाचे | Water Testing is Important Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जुलै २०, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.