सेंद्रिय कपाशी महत्त्वाची | Organic cotton is important

organic cotton is beneficial
Organic Cotton

सेंद्रिय कपाशी महत्त्वाची

Organic cotton is important    

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी नव्हतो. त्यामुळे इतर देशांशी मानहानीकारक करार करून अनेक वेळा निकृष्ठ दर्जाचे धान्य आयात करून सरकारने जनतेला खायला दिले. काहीही करून धान्य उत्पादनात स्वावलंबी व्हायचे या उद्देशाने नंतर सरकारने हरित क्रांती ( Green Revolution) राबविली. या कार्यक्रमात केवळ धान्य उत्पादनाकडे लक्ष दिले गेले, त्यामुळे रासायनिक खते ( Chemical fertilizers)  आणि किटकनाशके ( Pesticides) वापरून शास्त्रज्ञांनी आपल्या देशात विक्रमी धान्य उत्पादन करून दाखविले. परंतु आता असे रसायन युक्त धान्याचे मानवी शरीरावर वाईट परिणाम दिसू लागल्याने सेंद्रिय खते वापरून उत्पादित केलेल्या धान्याकडे पुन्हा लोक वळू लागले आहेत. आतातर काही लोक इतके जागरूक झाले की ते सेंद्रिय धान्याबरोबर सेंद्रिय कपड्यांचाही - Organic clothing आग्रह धरू लागले आहेत.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • आजची शेतीपद्धती
  • आयसॉट
  • नगदी पीक कापूस 
  • सर्जिकल कॉटन आणि सेंद्रिय बिछाना
  • सेंद्रिय कपडे
  • सेंद्रिय कापसाचे फायदे
  • निष्कर्ष

आजची शेतीपद्धती | Farming practices today

आज सर्वसाधारणपणे देशात सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे चित्र दिसून येते. खरं तर वैयक्तिक शेतकर्‍यांच्या पातळीवरील चळवळीच्या स्वरूपातून सेंद्रिय शेती आकारास आली आहे. त्यासोबत छोट्या, मध्यम आणि मोठ्या उद्योगसमुहांच्या पुढाकाराने चालना मिळालेली बहुतांश करार शेतीच्या स्वरूपातही सेंद्रिय शेती आहे. अनेक ठिकाणी राज्य सरकार पुरस्कृत अधिकृत प्रोत्साहनपर योजनेअंतर्गतही  ती सुरू आहे. या बहुतेक योजनांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार, प्रशिक्षणे, गांडूळ खत किंवा बायोडायनामिक खत युनिट उभारणी, प्रमाणीकरण आणि प्रमाणित सेंद्रिय शेतीमालाचे विपणन या बाबींसाठी साहाय्य दिले जाते. तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे प्रकल्प राबविले जातात. 

    सुरूवातीला या प्रकल्पांमध्ये शेतकर्‍यांचा प्रतिसाद हा सकारात्मकच दिसतो. मात्र, संबधित योजनेचा कालावधी संपल्यावर शेतकरी पुन्हा पूर्वीच्याच शेतीपद्धतीकडे म्हणजे रासायनिक शेतीकडे वळतात. कारण सेंद्रिय शेतीचे असे छोटे-मोठे प्रकल्प सुरूवातीला केवळ अन्नधान्य उत्पादनावरच केंद्रित होते. म्हणून काही ठिकाणचे अपवाद वगळता असे सर्व प्रकल्प व्यावसायिकरीत्या म्हणावे तसे यशस्वी ठरले नाहीत. भरवशाच्या बाजारपेठेचा अभाव, आर्थिक अडचणी, तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता अशा समस्यांनी ग्रासल्यामुळे अनेक प्रकल्प अजुनही नफ्यात आलेले नाहीत. परंतु काही ठिकाणी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीबाबत आपले धोरण बदलले, त्यांनी सेंद्रिय धान्य उत्पादनाऐवजी सेंद्रिय कपाशीची लागवड केली आणि अशा कपाशीला मागणी आणि भाव चांगला मिळाल्यामुळे सेंद्रिय कपाशीची लागवड यशस्वी ठरली आहे.

आयसॉट |  Indian Standard for Organic Textiles

सध्या सेंद्रिय कापूस उत्पादनात भारत हा आघाडीवर असून आता सेंद्रिय कापसापासून बनविण्यात आलेला सेंद्रिय धागा, सेंद्रिय कपडेही बाजारात मिळू लागले आहेत. २०११-१२ या आर्थिक वर्षात भारताने एकूण १४१७.८२ टन सेंद्रिय कापूस, धाग्याची निर्मीती केली. झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश ही राज्ये सेंद्रिय कापूस, सेंद्रिय रेशीम निर्मितीत आघाडीवर आहेत. गेल्या वर्षी सेंद्रिय वस्त्र उत्पादनांच्या निर्यातीतून १०२७ कोटी रूपयांचे उत्पन्न भारताला मिळाले. परंतु केवळ सेंद्रिय कापसाचे उत्पादन करणे पुरेसे नसून त्याला स्वतंत्र ब्रॅण्ड मिळवून देणेही आवश्यक आहे, त्यासाठी आयसॉट म्हणजेच इंडियन स्टॅण्डर्ड फॉर ऑरगॅनिक टेक्सटाईल ( Indian Standard for Organic Textiles ) हे निकष बनविण्यात आलेले आहेत. या निकषांनुसार केवळ देशी कापूस वाणांचाच वापर केला जातो. बीटी कपाशीच्या ( BT cotton) वाणांचा वापर करण्यास मनाई आहे. 

    यापूर्वी जगभर सेंद्रिय वस्त्रनिर्मीतीसाठी गॉटस् हे खाजगी कंपनीने बनवलेले निकष लागू होते. पण भारतातील वस्त्रनिर्मीतीची परंपरा लक्षात घेऊन आयसॉट हे स्वतंत्र निकष बनविण्यात आलेले आहेत. या निकषांचे पालन होते की नाही हे तपासण्यासाठी वेब आधारित प्रणाली, जीपीएस प्रणाली (GPS technique) आणि बारकोडिंग ( Barcoding) प्रणाली यांचा वापर केला जातो. सरकारमान्य प्रमाणीकरण संस्थांच्या माध्यमातून सेंद्रिय वस्त्रनिर्मीतीवर बारकाईने नजर ठेवून, चूक टाळण्याचा प्रयत्न केला जातो.

नगदी पीक कापूस  |  Cash Crop Cotton

सध्या राज्यात कापूस हे दुसरे महत्त्वाचे नगदी पीक ( Cash crop) आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी.वाणाची लागवड होत असल्यामुळे देशी वाण हळुहळु लोप पावत चालल्याची स्थिती आहे. गेल्या अवघ्या दहा वर्षात कापसाचा बियाणे उद्योग पूर्णपणे कंपन्यांच्या ताब्यात जाऊन शेतकरी बियाण्यासाठी परावलंबी होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर कापूस उत्पादकांना स्वावलंबी करण्यासाठी देशी कापसाचे पुनरूज्ज्वीन करण्याचा निर्णय आता कृषी विभागाने घेतला आहे. आयसॉटच्या निकषानुसार सेंद्रिय कपाशीच्या उत्पादनासाठी फक्त देशी वाणाचाच उपयोग करावा लागतो, त्यामुळे कृषी विभागाच्या या निर्णयामुळे सेंद्रिय कपाशीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना चांगल्या प्रतिचे बियाणे योग्य वेळी उपलब्ध होऊ शकणार आहे. 

    याशिवाय सेंद्रिय कापसाची वाढती मागणी विचारात घेऊन सेंद्रिय कापूस उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा आणि उत्पादकतावाढीसाठी  हाय डेन्सिटी (  High Density ) म्हणजेच सघन पद्धतीने कमी अंतरावर कापसाची लागवड करण्याचा सविस्तर प्रस्तावही राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत कसा राबविता येईल याबाबत शासनाने हालचाल सुरू केली आहे.

सर्जिकल कॉटन आणि सेंद्रिय बिछाना | Organic bed and  Surgical cotton 

सेंद्रिय कपाशीचा उपयोग केवळ कपडे निर्मीतीसाठी मर्यादित नसून त्यापासून आता सेंद्रिय सर्जिकल कॉटन, ( Surgical cotton) सेंद्रिय बिछाना ( Organic bed) अशा संकल्पनाही पुढे आल्या आहेत. माणसांच्या वैद्यकीय उपचारासाठी लागणार्‍या दवाखान्यासाठी कापसावर ( सर्जिकल कॉटन) देशात प्रथमच संशोधन झाले आहे. त्याचे नावही फुले धन्वंतरी असे ठेवण्यात आले आहे. हा एक देशी कपाशीचा वाण आहे. या वाणाचे रूईची पाणी शोषण्याची क्षमता, शोषलेले पाणी सोडण्याची कमी क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता इतर वाणांच्या तुलनेत सरस असल्याचे आढळून आले आहे. या देशी वाणाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास सर्जिकल उपयुक्तता कशी वाढेल यावर संशोधन सुरू आहे. तसेच आतातर सेंद्रिय बिछान्यावरही संशोधन सुरू झाले आहे. असा बिछाना न्यूयॉर्क शहरात सोहो येथे विक्रीस ठेवला असून त्याचे नाव ट्रायटन असे आहे. 

    या बिछान्यात कुठलाही धातू वापरलेला नाही. या बिछान्यात सेंद्रिय कापसासोबत नैसर्गिक पद्धतीने बनविलेले रबर, घोड्याचे केस, नारळाच्या शेंड्या, रेशीम, कॅक्टसचे धागे, समुद्री शैवाल ( Rubber, horse hair, coconut shells, silk, cactus thread, seaweed ) यांचाही उपयोग केला आहे. या बिछान्यावर झोपल्यास अस्थमा, ऍलर्जी, थायरॉईड, संधिवात ( Asthma, Allergy, Thyroid, Arthritis ) नियंत्रित करता येते, असे न्यूयॉर्क डेलीने म्हटले आहे.  

भारतातील सेंद्रिय कापसापासून तयार झालेला धागा व कपडे यांना युरोप व अमेरिकेत माागणी वाढत आहे. सी अँड ए, नायके, वॉलमार्ट-सॅम्स क्लब, विल्यम्स -सोनोमा, एच ऍण्ड एम, ऍन्विल निटवेअर, क्रूप स्वित्झर्लंड, ग्रीनसोर्स, लेवी स्ट्रॉस, टारगेट, आदिदास, नॉर्डस्ट्रॉम असे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड भारतातील सेंद्रिय धाग्यास पसंती देतात. जगभर आरोग्याप्रती जागरूकता वाढत आहे.

सेंद्रिय कपडे | Organic Cotton

अन्नधान्य, पेय, प्रक्रियायुक्त पदार्थ, औषधे या सर्वांसोबत आता तर कपडेही सेंद्रिय हवेत अशी मागणी सर्वत्र वाढत आहे. या मागणीचा विचार करता सेंद्रिय कपडे निर्मितीतील वाव लक्षात येतो. आजघडीला जगातील केवळ २० देशांमध्येच सेंद्रिय कापूस उत्पादन होते. यामध्ये भारत आघाडीवर असून सीरिया, तुर्की, चीन, अमेरिका यांचा समावेश आहे. 

सेंद्रिय कापसाचे फायदे । Benefits of organic cotton

कृत्रिम कीटकनाशके, तणनाशके आणि जनुकीय सुधारित जीव (GMOs) शिवाय उगवलेला सेंद्रिय कापूस,पारंपारिक कापसाच्या तुलनेत अनेक फायदे देतात. हे फायदे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक पैलूंचा विस्तार करतात. येथे सेंद्रिय कापसाचे काही प्रमुख फायदे आहेत:
  • रसायनांचा वापर कमी : सेंद्रिय कापूस लागवड कृत्रिम कीटकनाशके आणि खतांचा वापर टाळते आणि परिसंस्थेची हानी कमी करते.
  • निरोगी शेतमजूर: सेंद्रिय कापूस शेतीमध्ये सामान्यत: कमी हानिकारक रसायनांचा समावेश असतो, ज्यामुळे शेतकर्‍यांसाठी सुरक्षित कामाची परिस्थिती निर्माण होते आणि त्यांचा घातक पदार्थांचा संपर्क कमी होतो.
  • कमी झालेले अवशेष एक्सपोजर: सेंद्रिय कापूस उत्पादने बहुतेक वेळा कृत्रिम कीटकनाशके आणि रसायनांच्या अवशेषांपासून मुक्त असतात. संवेदनशीलता किंवा ऍलर्जी असलेल्या ग्राहकांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
  • नॉन-जीएमओ: सेंद्रिय कापूस हे जनुकीय सुधारित जीवांशिवाय (जीएमओ) घेतले जाते, जे गैर-जीएमओ उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांना पर्याय देतात.
  • बाजारपेठेतील वाढती मागणी: सेंद्रिय कापसासह शाश्वत आणि पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी ग्राहकांची मागणी वाढत आहे. ही मागणी अधिकाधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करते.
  • प्रमाणन मानके: सेंद्रिय कापूस अनेकदा प्रतिष्ठित संस्थांद्वारे प्रमाणित केला जातो, जसे की ग्लोबल ऑरगॅनिक टेक्सटाईल स्टँडर्ड (GOTS) किंवा ऑरगॅनिक कंटेंट स्टँडर्ड (OCS), ग्राहकांना उत्पादनाची सत्यता आणि टिकावूपणाची खात्री प्रदान करते.

निष्कर्ष ( Conclusion)-

बीटी कपाशीचे मानवी आणि शेतजमिनीवर झालेले दुष्परिणाम आणि सेंद्रिय कापूस उत्पादनात भारताची आघाडी या बाबी लक्षात घेता सेंद्रिय कापूस आणि त्यानंतर सेंद्रिय कपड्यांच्या निर्मीतीतून आणि निर्यातीतून चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी देशातील शेतकर्‍यांना आणि कापड उद्योजकांना प्राप्त झाली आहे. प्रथम या आणि भरपूर नफा कमवा या तत्त्वानुसार शेतकरी आणि कापड उद्योजकांनी सेंद्रिय कपडे सध्याची आघाडी अशीच कायम ठेवायला हवी.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे, 
Read more about author
----------------------
Background image source- Photo by Irina Iriser: https://www.pexels.com/photo/white-cotton-flowers-in-vase-beside-clock-1734435/

----------------------------------------
हे सुद्धा वाचा-
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने