साखरउद्योगातील वास्तव | Reality in Sugar Industry

Reality-in-sugar-industry
Reality-in-sugar-industry

साखरउद्योगातील वास्तव

स्थापनेपासून ते आजपावेतो कृषीआधारीत असलेला साखरउद्योगात नेहमीच चर्चेत राहीला आहे. ऊसाचे जास्त झालेले उत्पादन असो किंवा कमी झालेले उत्पादन असो, ऊस तोडणीबाबतचा वाद, ऊसतोडणी मजुरीचा वाद, साखरेची निर्यात किंवा साखर कारखान्यातील इथेेनॉल व अल्कोहोल निर्मीती असो, प्रत्येकवेळी साखरउद्योग हा वादातच राहिलेला आहे.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • कृषी आधारित उद्योगात क्रमांक एक
  • साखर कारखान्यांमध्ये दुय्यम उत्पादने
  • ऊस पिकाखालील क्षेत्र 
  • ऊस लागवडीचे प्रमुख तीन हंगाम
  • ऊसाची तोडणी 
  • साखरेचा वापर 
  • साखर उद्योग आणि आयात-निर्यात धोरण
  • निष्कर्ष

कृषी आधारित उद्योगात क्रमांक एक | Number one in agro-based industries

इतर कृषीआधारीत उद्योगांच्या तुलनेत हा क्रमांक एकचा उद्योग समजला जातो. ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटी लोकांचा उदरनिर्वाह हा या उद्योगामुळे चालतो. साखरेतून महाराष्ट्राला २२०० कोटी रूपयांपेक्षा महसूल दरवर्षी प्राप्त होतो. ऊस लागवडीपासून ते कारखान्यातून साखर बाजारपेठेत पोहोचेपर्यंत सर्व प्रकारच्या प्रक्रियांमध्ये हजारो लोकांना थेट रोजगार याच उद्योगामुळे उपलब्ध होतो.

महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ६५ वर्षापूर्वी स्थापन झाला. खरंतर साखरेच्या सहकारी कारखान्यांमुळेच राज्यात सहकारी चळवळीचा चालना मिळाली. राज्यात एकूण २०२ (२०१०च्या आकडेवारीनुसार) साखर कारखान्यांची नोंदणी झालेली असून यापैकी काही कारखाने आजारी असून काही बंद पडलेले आहेत. वर्ष २०११-१२ च्या आकडेवारीनुसार सहकारी तत्त्वावर ११७ तर खाजगी ४८ साखर उद्योग आहेत. कोल्हापूर-३३, पुणे-४९, अहमदनगर-२८, औरंगाबाद-२२, नांदेड-२७, अमरावती-३, नागपूर-३ असे १६५ साखर कारखाने राज्यात विखुरलेले आहेत. संपूर्ण देशात मात्र ५१६ साखर कारखाने सध्या गाळप करित आहेत. या चालू असलेल्या साखर उद्योगामुळे राज्यात दरवर्षी १५००० कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल होते.

    उसाची लागवड तीन हंगामात होते. पीक परिपक्व होण्यासाठी सुमारे 12 ते 18 महिने लागतात.उसाला त्याच्या वाढीच्या काळात नियमित सिंचन, खते आणि कीड नियंत्रणाची आवश्यकता असते. निरोगी आणि मजबूत रोपे मिळावीत यासाठी शेतकरी पिकाची काळजी घेतात. 

साखर कारखान्यांमध्ये दुय्यम उत्पादने | Secondary products in sugar factories

साखर कारखान्यांमध्ये केवळ साखरच निर्मीत होत नाहीतर त्यासोबत इतर दुय्यम उत्पादनेही निर्माण होतात. साखरेव्यतिरिक्त, उसाच्या प्रक्रियेतून मोलॅसिस आणि बगॅस सारखे उप-उत्पादने तयार होतात. मोलॅसेसचा वापर अल्कोहोल आणि पशुखाद्य निर्मितीमध्ये केला जाऊ शकतो, तर बगॅसचा वापर बहुधा ऊर्जेचा अक्षय स्रोत म्हणून किंवा कागद आणि लगदा उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून केला जातो. सुमारे १०० टन ऊस गाळप केल्यास त्यापासून अंदाजे २८ ते ३० टन ऊसाचे चिपाड, (Sugarcane chips) ४ टन मळी, सुमारे ०.३ टन भट्‌टी राख हे घटक बाहेर पडतात. तसेच ही दुय्मम उत्पादने इतर अनेक उद्योगांना कच्चा माल म्हणून उपयोगी पडतात. साखर कारखान्यांमुळे कारखान्यांच्या आसपासच्या भागातील विकास झपाट्याने झाला. काही कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबर मद्यार्क, (Alcohol) रसायने आणि कागद निर्मीती (Paper production)  यासारख्या उत्पादनांवरही सध्या लक्ष केंद्रित केले आहे. 

     तसेच कारखान्यांमार्फत विविध पाटबंधारे योजना, लिफ्ट इरिगेशनसारख्या विकासाच्या योजना राबविल्या गेल्या, त्यासोबत शाळा, महाविद्यालये, दवाखाने यासारख्या कल्याणकारी संस्था स्थापन केल्या गेल्या. साखर कारखान्यांमुळे औद्योगिक विकासाबरोबर शैक्षणिक व सामाजिक विकासही (Educational and social development) साधला गेला. विशेष म्हणजे विजेच्या सध्या सुरू असलेल्या भयानक वीज टंचाईला दूर करण्यात साखर कारखाने हातभार लावत असतात. कारण राज्यात ६१ साखर कारखान्यांच्या माध्यमातून ९८२ मेगावॅट सहवीज निर्मितीची सरकारने परवानगी दिली आहे. (सन २०१०ची नोंद)

ऊस पिकाखालील क्षेत्र | Area under sugarcane crop

भारतातील ऊस पिकाखालील एकूण क्षेत्राच्या (सन २०१०ची नोंद)(४४.०८ लाख हेक्टर) १७.४७ टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात असून देशातील ऊस उत्पादनाच्या सुमारे २० टक्के उत्पादन राज्यात होते. राज्याची दरहेक्टरी उत्पादकता ७४.१ टन प्रति हेक्टर असून ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा ( ६६.८टन प्रति हेक्टर) जास्त आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.५४ टक्के आहे. संपूर्ण भारताचा विचार साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

ऊस लागवडीचे प्रमुख तीन हंगाम | Major three seasons of sugarcane cultivation

महाराष्ट्रात ऊस लागवडीचे प्रमुख तीन हंगाम आहेत. सुरू-१५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी, पूर्वहंगामी-१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, आडसाली- १५ जुलै ते १५ ऑगस्ट असे हे तीन हंगाम आहेत. सध्या भारतात प्रमुख पाच राज्ये साखर उत्पादनांमध्ये अग्रेसर आहेत. त्यांच्या उत्पादनाची आकडेवारी लाख मेट्रीक टनांमध्ये पुढीलप्रमाणे आहे- महाराष्ट्र-९०.७२, उत्तरप्रदेश-५८.८३, कर्नाटक-३६.१६, तमिळनाडू-१५.७५, गुजरात-१२.५. फक्त महाराष्ट्राचा विचार करता साखर उत्पादनात पुणे जिल्हा अग्रेसर असून विविध जिल्ह्यांचे लाख क्विंटलमध्ये साखर उत्पादन पुढील प्रमाणे-पुणे-३७०.३२, कोल्हापूर-२३६.८९, अहमदनगर-१३९.३६, नांदेड-९०.४७, औरंगाबाद-६५.४९, अमरावती-३.७१, नागपूर-०.९७ याप्रमाणे राज्यात ९०७.२१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन २०१०-११ साली झाले आहे.

ऊसाची तोडणी | Sugarcane harvesting

भारतातील अनेक भागात अजूनही ऊस हाताने काढला जातो. परिपक्व उसाचे देठ जमिनीच्या जवळ कापण्यासाठी मजूर विळा वापरतात. अलिकडच्या वर्षांत, मजुरांची कमतरता दूर करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी यांत्रिक कापणीकडे लक्ष्य दिले जात आहे. ऊसाचे देठ कापण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी यांत्रिक कापणी यंत्राचा वापर केला जातो. ही पद्धत जलद आहे. तोडणीनंतर ऊस ट्रक किंवा इतर वाहतूक वाहनांच्या साहाय्याने प्रक्रियेसाठी साखर कारखान्यांमध्ये नेला जातो. भारतातील ऊस कापणीचा हंगाम प्रदेशानुसार बदलतो, परंतु बहुतेकदा तो ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत येतो. कापणीच्यावेळी उसामध्ये साखरेचे प्रमाण योग्य राहील याची खात्री करण्यासाठी वेळ महत्त्वाची आहे.

    राज्यात पूर्वीपासून ऊसाची तोडणी ही मजूरांमार्फतच करण्यात आली आहे. राज्यात सुमारे तीन लाख ऊस तोडणी मजूर आहेत. परंतु ऊसतोडणीसाठी ही संख्या अपुरी आहे. म्हणूनच मजुरांच्या तुटवड्यामुळे ऊसाची तोडणी यंत्राद्वारे करण्याचे धोरण सरकारने स्वीकारलेले आहे.

साखरेचा वापर | Consumption of sugar

भारत हा ब्राझिलनंतरचा जगातला द्वितीय क्रमांकाचा साखरेचा उत्पादक देश आहे. देशात दरवर्षी सुमारे २३० लाख टन (सन २०१०ची नोंद)साखरेचे उत्पादन होते. या साखरेच्या एकूण उत्पादनापैकी ३० टक्के मेवा-मिठाईसाठी, २५ टक्के शीतपेयांसाठी, १२ टक्के आइस्क्रीम, (Ice cream) औषधे व इंडस्ट्रीयल पावडरसाठी अशी एकूण ६७ टक्के साखर व्यापारी कारणांसाठी वापरली जाते. उर्वरित केवळ ३३ टक्केच साखर भारतीय जनता घरगुती कारणांसाठी वापरते. तसेच १०० किलो ऊसापासून साधारणपणे ११ किलो साखर मिळते. उर्वरित ८९ टक्के मटेरियल वाया न जाता त्यापासून दारू, ( Alcohol) ऍसिड, (Acid) इथेनॉल, ( Ethanol) स्पिरिट, ( Spirit)  इथाईल ( Ethyl)  व अन्य १८ उपपदार्थ बनविता येतात.

साखर उद्योग आणि आयात-निर्यात धोरण |Sugar industry and import-export policy

असा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील साखर उद्योग दरवर्षी अनेक समस्यांना तोंड देतो. जास्त उत्पादन होणे किंवा ऊसाचे कमी उत्पादन होणे अशा दोन्ही परिस्थितींमुळे साखर उद्योग अनेकदा अडचणीत आला आहे. तसेच सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचा अयोग्य फटका दरवर्षी साखर उद्योगाला बसतो. ऊसाला दर हा केवळ वजनाच्या आधारे दिला जातो. खरंतर ऊसाच्या साखर उताराच्या आधारावर त्या त्या ऊस उत्पादकास दर दिला पाहिजे. परंतु ऊसाचा साखर ऊतारा तपासणारी मजबूत, विश्‍वसनीय आणि स्वयंसिद्ध अशी यंत्रणा भारतात अजुनही विकसित झालेली नसल्यामुळे साखर उतार्‍याच्या आधारे दर देणे शक्य झालेले नाही. 

    तसेच ऊसाच्या अयोग्य दरामुळे तर साखर उद्योग प्रत्येकवर्षी चर्चेत आला आहे. अशा अनिश्‍चिततेमुळे भारत साखरेचा मोठा निर्यातदार आणि आयातदार होत असतो. जेव्हा भारतात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होते, तेव्हा साखरेच्या किमती उतरतात व उत्पादकांचे नुकसान होते तर जेव्हा भारतात साखरेचे उत्पादन कमी होते तेव्हा किमती वाढतात आणि ग्राहक भरडून निघतो. ऊसाला जास्त भाव मिळू लागला की शेतकरी जास्तीतजास्त ऊस लागवडीखाली आणतात. परंतु हे पीक १८ महिन्यानंतरच तयार होणार असल्याने, ते जेव्हा तयार होते तेव्हापर्यंत साखरेचे भाव कोसळेलेले असतात आणि पर्यायी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते.

निष्कर्ष ( Conclusion)-

साखरेचे असे हे अयोग्य चक्र वर्षानुवर्षे चालू आहे. दरवर्षी ऊसाखाली किती क्षेत्र आणायचे, यासाठी कुणीही ठोस भूमिका घ्यायची तयारी आतापर्यंत दाखविलेली नाही. त्यामुळे आता साखर उद्योगांमध्ये पुन्हा अस्थिरेची चाहूल लागली आहे. साखरेवरील आयात-निर्यात धोरणाबाबत सरकारने ताबडतोब योग्य ती हालचाल न केल्यास पुन्हा हा उद्योगाला संकटाशी सामना करावा लागेल, असे वाटते.

- योगेश रमाकांत भोलाणे

साखरउद्योगातील वास्तव | Reality in Sugar Industry साखरउद्योगातील वास्तव | Reality in Sugar Industry Reviewed by Yogesh Ramakant Bholane on ऑगस्ट २७, २०२१ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.