सोने खरेदी करतांना रहा जागरूक | Be careful when buying gold

Be careful when buying gold
Buying gold

सोने खरेदी करतांना रहा जागरूक

सोन्यातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क वापरणे बंधनकारक केले आहे. ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीएसआय) कडून हा हॉलमार्क दिला जातो. म्हणून ग्राहकांनी सोने खरेदी करतांना त्यावर हॉलमार्क आहे का नाही ते तपासून घेणे आवश्यक आहे.

तीन रूपयाचा पेन विकत घेतांना आपण चार वेळा रेघोट्या मारून चेक करतो, भाजी विकत घेतांना आपली नजर तराजूवर असतेच, अगदी रद्दी आणि भंगार विकतांनाही आपण वजनकाट्यावर लक्ष ठेवून असतो. अशीच तपासणी सोने विकत घेतांना आपण करतो का? याचे उत्तर बरेच जण नाही असेच देतील. बहुधा सोने विकत घेतांना नेमकी कोणती तपासणी करावी हेच ग्राहकांना ठाऊक नसावे. सोने खरेदी करणे हा एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय आहे आणि सोने खरेदी करतांना अनेक घटकांचा विचार करावा लागतो. येथे काही प्रमुख घटक दिले आहेत.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 
  • भारतात सोन्याचे महत्त्व
  • सोने खरेदी करतांना घ्यावयाची काळजी
  • विश्वासार्ह ज्वेलर्स
  • सोन्याची शुद्धता 
  • हॉलमार्क प्रमाणन
  • बुलियन बँक
  • ऑलॉय
  • कॅरेटोमीटर
  • सध्याचे बाजार भाव
  • सोन्याचे प्रकार
  • बायबॅक धोरण
  • सोन्याची सुरक्षा आणि विमा
  • निष्कर्ष

भारतात सोन्याचे महत्त्व । Importance of Gold in India

भारतामध्ये सोन्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व मोठे आहे. भारतातील सोन्याबद्दल येथे काही मनोरंजक तथ्ये आहेत:

  • सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व: भारतात सोन्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. हे शुभ प्रसंग, सण आणि विधी यांच्याशी संबंधित आहे. सोन्याचे दागिने अनेकदा संपत्ती, दर्जा आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून समजले जातात. 
  • लग्नाची परंपरा: भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सोन्याची भूमिका महत्त्वाची असते. वधूला सोन्याचे दागिने, ज्यात हार, कानातले, बांगड्या आणि काहीवेळा "मंगळसूत्र" नावाचा सोन्याचा धागा देखील असतो, जो वैवाहिक स्थितीचे प्रतीक दर्शवितो. 
  • भारतातील सोन्याचा साठा: भारत हा जागतिक स्तरावर सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे. दागिने आणि सोन्याच्या बार आणि नाण्यांमधील गुंतवणूक या दोन्ही रूपात देशात लक्षणीय सोन्याचा साठा आहे.
  • सोन्याची गुंतवणूक: सोने ही भारतातील सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अनेक लोक महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेपासून बचाव म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. गोल्ड बार, नाणी आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हे गुंतवणुकीचे लोकप्रिय पर्याय आहेत.
  • सुवर्ण मुद्रीकरण योजना: लोकांना त्यांचे निष्क्रिय सोने व्याजाच्या बदल्यात बँकांमध्ये जमा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने सुवर्ण मुद्रीकरण योजना (Gold Monetization Scheme) सुरू केली आहे. देशातील सोन्याचा वापर उत्पादक हेतूंसाठी करणे हे यामागे आहे.
  • सोने आयात: भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. दिवाळी आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या सणांमध्ये आणि लग्नाच्या हंगामात सोन्याची मागणी खूप जास्त असते.
  • अक्षय्य तृतीया: अक्षय्य तृतीया हा दिवस भारतात सोने खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते की अक्षय्य तृतीया या दिवशी सोने खरेदी करणे हे चांगले भाग्य आणि यश आणते.
  • सुवर्ण कर्ज उद्योग: भारतामध्ये सोन्याच्या कर्जाचा भरभराटीचा उद्योग आहे जेथे लोक त्यांचे सोन्याचे दागिने कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून वापरू शकतात. विशेषतः ग्रामीण भागात ही एक सामान्य प्रथा आहे.
  • गोल्ड हॉलमार्किंग: भारतीय मानक ब्युरो (BIS) ने सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी हॉलमार्किंग प्रणाली सुरू केली आहे. BIS हॉलमार्क सोन्याच्या वस्तूंची गुणवत्ता आणि सत्यता प्रमाणित करतो.
  • सोन्याची खाण: भारताकडे मर्यादित सोन्याचा साठा आहे आणि वापरण्यात येणारे बहुतेक सोने आयात केले जाते.
  • गोल्ड ईटीएफ: गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) गुंतवणूकदारांना धातूची भौतिक मालकी न ठेवता सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्यायी मार्ग देतात. या आर्थिक साधनांचा स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार केला जातो.
  • सोन्याचा पुनर्वापर: जुन्या दागिन्यांमधून सोन्याचा पुनर्वापर करणे ही भारतातील एक सामान्य प्रथा आहे. 
  • धार्मिक अर्पण मध्ये सोने: अनेकदा मंदिरे आणि धार्मिक देवतांना सोने दान म्हणून अर्पण केले जाते. मंदिरांमध्ये, विशेषत: प्रमुख मंदिरांमध्ये भक्त सोन्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर दान देत असतात. 

सोने खरेदी करतांना घ्यावयाची काळजी । Precautions to be taken while buying gold

वर उल्लेख केलेले सोन्याचे महत्त्व सर्वश्रुत आहे. सोने कितीही महाग असले तरी अनेकांना सोने खरेदीला सामोरे जावे लागते. ही सोने खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी हे खाली स्पस्ट केले आहे. 

विश्वासार्ह ज्वेलर्स | Trusted Jewellers -

सोने खरेदी प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह ज्वेलर्स कडून करा. खरेदी करतांना कर, शिपिंग शुल्क किंवा डीलर कमिशन यांसारख्या खरेदीशी संबंधित अतिरिक्त खर्चांबद्दल अगोदरच माहिती घ्या. दुकानांमधून खरेदी करण्यात येणार्‍या सोन्यावर घडणावळ शुल्क अर्थात मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. सोन्याच्या किमतीवर तीन टक्के आणि मेकिंग चार्जेसवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते.
हे अतिरिक्त खर्च सोन्याच्या एकूण किंमतीवर परिणाम करू शकतात. बनावट सोन्यापासून फसू नये म्हणूनही प्रतिष्ठित ज्वेलर्स मार्फत दागिने खरेदी महत्त्वाची असते.

सोन्याची शुद्धता | Gold Purity

सोन्याची शुद्धता तपासा, सामान्यतः सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोने शुद्ध सोने मानले जाते, चोवीस कॅरेटचे सोने हे उच्च प्रतीचे सोने असते. त्याला सर्वाधिक भाव असतो. परंतु सोन्याचे दागिने मात्र १० कॅरेटपासून ते २४ कॅरेट अशा प्रकारची शुद्धतेच्या स्वरूपात उपलब्ध असतात. कमी कॅरेट मूल्ये इतर धातूंचे मिश्रण दर्शवतात. म्हणून दागिने विकत घेतांना त्यावर ते दागिने किती कॅरेटचे आहे, हे बघणे फार महत्त्वाचे असते. बहुतेक वेळा दागिन्यामध्ये किती सोन्याचा वापर केला आहे, याची माहिती अंकांच्या स्वरूपात दिलेली असते. जसेे एखाद्या दागिन्यावर ९१६ क्रमांक असेल तर त्यामध्ये ९१.६ टक्के सोने आणि इतर धातू यांचा समावेश असतो. असे सोने २२ कॅरेटचे सोने असते. अशा क्रमांकाचा खालील प्रमाणे अर्थ लावावा,
२३ कॅरेट-९५८, २२ कॅरेट-९१६, २१ कॅरेट-८७५, १८ कॅरेट-७५०, १७ कॅरेट-७०८, १४ कॅरेट-५८५, ९ कॅरेट-३७५.

हॉलमार्क प्रमाणन | Hallmark 

सोन्यातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क वापरणे बंधनकारक केले आहे. ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीएसआय) कडून हा हॉलमार्क दिला जातो. म्हणून ग्राहकांनी सोने खरेदी करतांना त्यावर हॉलमार्क आहे का नाही ते तपासून घेणे आवश्यक आहे. सोन्याचे दागिने किंवा बुलियनवर हॉलमार्क पहा. हॉलमार्क सोन्याची सत्यता आणि शुद्धता प्रमाणित करतो, त्याच्या गुणवत्तेची खात्री देतो. हॉलमार्क ( Hallmarks ) असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतांना मॅग्निफाइंग ग्लास वापरून हॉलमार्कमध्ये समाविष्ट असलेल्या पुढील ५ गोष्टी तपासाव्यात- बीएसआय प्रमाणचिन्ह, शुद्धता / अस्सलता श्रेणी, पारख आणि हॉलमार्किेंग केंद्राचे चिन्ह, चिन्हांकनाचे वर्ष जसे २०००साठी ए, २००९ साठी के आणि २०११ साठी एन, सुवर्णकाराचे ओळखचिन्ह.

बुलियन बँक | Bullion Bank

बिस्किट किंवा बारच्या स्वरूपात सोने खरेदी केली तर त्याचे शुद्धतेचे प्रमाण आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरविलेले असते. चीप, बार किंवा कॉईन्सवर बुलियन बँकांची ( marks of bulliab banks) चिन्हे असतात. तो बार कोणत्याही सराफाकडे जाऊन विकला तरी ते प्रमाण बदलत नाहीत.

ऑलॉय | Alloy

दागिना तयार करतांना त्यात ऑलॉय ( alloy) वापरले जाते. सोने हा धातू अत्यंत मऊ असल्याने दागिने घडवितांना, दागिन्याचा आकार व्यवस्थित राहावा म्हणून ऑलॉयचा वापर करतात. परंतु त्यामुळे सोन्याची शुद्धता कमी होते. म्हणून दागिने खरेदी करतांना या बाबीचा आवर्जून विचार करावा.

कॅरेटोमीटर | keratometer

अलिकडे सोनारांच्या दुकानांमध्ये कॅरेटोमीटर ( keratometer ) नावाचे यंत्र सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी वापरले जाते. क्ष किरणांच्या तंत्रज्ञानावर आधारित ( based on X rays ) असणार्‍या या यंत्राद्वारे दागिना न मोडता सोन्याची शुद्धता तपासता येते. म्हणून शक्यतो ज्या ठिकाणी हे यंत्र उपलब्ध आहे तेथूनच दागिन्यांची खरेदी करावी.

सध्याचे बाजार भाव | Current Market Price:

सोन्याच्या सध्याच्या बाजारभावांबद्दल माहिती ठेवा. किमतींमध्ये दररोज चढ-उतार होतात, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी सध्याच्या दरांची माहिती घ्यावी.

सोन्याचे प्रकार | Types of Gold

नाणी, बार किंवा दागिने यासारख्या विविध प्रकारात सोने खरेदी केले जाते. प्रत्येक खरेदीचे फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात. जसे की दागिने पुन्हा विकले की बरीच घट विचारात घेऊन ज्वेलर्स आपल्याला पैसे देतात, मात्र बार किंवा नाणी यांच्याबाबत सहसा घाट विचारात घेत नाही.

बायबॅक धोरण | Buyback policy : 

विक्रेत्याच्या बायबॅक धोरणाची चौकशी करा, म्हणजे ज्या ज्वेलर्स कडून सोने विकत घेतले, त्याच दुकानात परत विकणे. भविष्यात तुम्ही त्याच ज्वेलर्सला सोने परत कसे विकू शकता हे जाणून घ्या.

सोन्याची सुरक्षा आणि विमा | Gold security and Insurance : 

तुम्ही तुमचे सोने कुठे आणि कसे साठवाल याचा विचार अगोदर करा. काही लोक सोने सेफ डिपॉझिट बॉक्समध्ये किंवा बँकेतील लॉकर मध्ये किंवा घराच्या तिजोरीत साठवणे निवडतात. चोरी किंवा हरवण्यापासून तुमच्या सोन्याचा पुरेसा विमा कसा काढता येईल याचा विचार करा. 

निष्कर्ष ( Conclusion)-

सोने खरेदी करण्यापूर्वी वरील सर्व बाबींचा सखोल विचार केला पाहिजे, कारण सोने खरेदी हा किरकोळ खर्च नसून खूप पैसा त्यासाठी खर्च होत असतो. सहज म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून सॊने खरेदी करायची असल्यास बार किंवा नाणी या प्रकारात सोने खरेदी करणे योग्य वाटते आणि विशेष प्रसंगासाठी दागिन्यांसाठी सॊने खरेदीचा विचार करावा.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

image source-1) nitin-saxena-rbcNnnG4rgc-unsplash Photo by Nitin Saxena on Unsplash

सोने खरेदी करतांना रहा जागरूक | Be careful when buying gold सोने खरेदी करतांना रहा जागरूक | Be careful when buying gold Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जुलै ०१, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.