भाजीपाल्याचा राजा वांगी | Brinjal Is King Of Vegetables

Brinjal nutritional inportance
Brinjal diet importance

भाजीपाल्याचा राजा वांगी

फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब तसेच भाजीपाल्याचा राजा म्हणून वांगी असे म्हटले जाते. कारण का तर त्याच्या डोक्यावर मुकुट असतो, असे गमतीने जरी म्हटले जात असले तरी वांग्याची सर्व बाबतीत माहिती जाणून घेतल्यास त्यात राजा होण्यास सर्व लायक गुणधर्म आढळून येतात.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • लोकप्रिय फळभाजी -वांगी
  • शास्त्रीय दृष्टीने वांगी
  • विदेश आणि भारतातील वांगी उत्पादन
  • वांगी लागवड
  • वांग्याचे आहार महत्व
  • देश-विदेशात खाण्यासाठी वांग्याचा उपयोग
  • वांगी आणि ऍलर्जी
  • बी.टी.वांगे
  • निष्कर्ष

लोकप्रिय फळभाजी -वांगी | Popular fruit vegetable - Eggplant

वांगी ही भारतातील सर्व लाकांची आवडीची फळभाजी आहे. भारतातील बहुतेक सर्व राज्यांमधुन याची लागवड केली जाते. गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत व ग्रामीण आणि शहरी भागात लोकप्रिय अशी ही फळभाजी जवळजवळ वर्षभर उपलब्ध असते. फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब तसेच भाजीपाल्याचा राजा म्हणून वांगी असे म्हटले जाते. कारण का तर त्याच्या डोक्यावर मुकुट असतो, असे गमतीने जरी म्हटले जात असले तरी वांग्याची सर्व बाबतीत माहिती जाणून घेतल्यास त्यात राजा होण्यास सर्व लायक गुणधर्म आढळून येतात. 

शास्त्रीय दृष्टीने वांगी | Eggplant in scientific terms

खरंतर वांगी झुडुपवजा वाढणारी वर्षायू वनस्पती आहे. पाने, फांद्या व फळांच्या देठावर काटे असतात. काही जाती बिनकाटेरी किंवा अगदी कमी प्रमाणात काटे असलेल्या असतात. फुले जांभळी किंवा पांढर्‍या रंगाची असतात. फळांचा आकार गोल किंवा लांबट असून रंग हिरवा, काळा, जांभळा किंवा या रंगाची सरमिसळ असलेला असा दिसतो. 

विदेश आणि भारतातील वांगी उत्पादन | Eggplant production abroad and in India 

विशेष म्हणजे वांग्याचे मूळस्थान भारत आहे. वांगी कुळातील १६ पेक्षा जास्त स्पेसीज भारतातील निरनिराळ्या भागातं वन्य स्वरूपात आढळतात. भारतात सुमारे ४००० हजार वर्षांपूर्वीपासून वांगी लागवड केली जात आहे. जागतिक पातळीवर एकूण वांगी उत्पादनापैकी ५८ टक्के उत्पादन घेऊन चीन प्रथम क्रमांकावर असून ३१ टक्के उत्पादन घेऊन भारत दुसर्‍या स्थानावर आहे. भारत, चीन, युनायटेड स्टेटस्, इजिप्त, तुर्की, जपान हे देश खास करून वांगी भरपूर खाणारे देश म्हणून गणले जातात, कारण जगातील एकूण वांगी उत्पादनापैकी एकूण ९४ टक्के वांग्यांचे उत्पादन याच देशांमध्ये होते. 

    भारतात प्रामुख्याने पश्‍चिम बंगाल, ओरीसा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व इतर राज्यांमधुन वांग्याची लागवड केली जाते. भारतात वांगी पिकाखाली सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादन १२ हजार मे. टन आहे. भारतातील सरासरी उत्पादकता १८.०६ टन प्रति हेक्टर एवढी आहे. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमधुन हे पीक घेतले जाते. भाजीपाला पिकांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी १२.८ टक्के क्षेत्र या महत्त्वाच्या भाजीपाला पिकाखाली येते. महाराष्ट्रात या पिकाखाली जवळजवळ ३१ हजार हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ५५८ मे. टन व उत्पादकता १८.३ मे.टन प्रति हेक्टर एवढी आहे. 

वांगी लागवड | Eggplant cultivation

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपिक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. तसेच फळबागांमध्ये सुरूवातीच्या ३-४ वर्षाच्या काळात आंतरपीक म्हणून वांग्याची लागवड करतात. सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांगी हे पीक घेता येते. भाजीपाला पिकांचे वर्गीकरणात वांगी ही फळभाजी म्हणून गणली जाते. परंतु विविध भागानुसार लोकांच्या आवडी विशिष्ट वांग्याच्या जातींसाठी वेगवेगळ्या आहेत. 

    सांगली, सातारा भागात कृष्णाकाठी चविष्ठ वांगी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंद केली जातात. तर खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असुन विदर्भात कमी काटे असेलेली वांगी सर्वांना आवडतात. उत्तर भारतात काटे नसलेल्या जातीच सर्वांना आवडतात. म्हणून वांग्याच्या लागवडीसाठी सुधारित किंवा संकरित वाण निवडणे तर महत्त्वाचे आहेच, त्यासोबत त्या परिसरातील लोकांची मागणी असणारे वाण तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळवणारा वाण निवडणे गरजेचे असते. निवडलेला वाण भरपूर उत्पादन देणारा व रोग आणि किड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा असावा व तेथील हवामानाशी मिळते-जुळते घेणारा वाण निवडणे महत्त्वाचे असते. तसेच वांगी केवळ शेतातच नव्हेतर परसबागेत, बंगल्याच्या आवारात उत्तमरित्या घेता येतात. 

वांग्याचे आहार महत्व | Importance of eggplant in diet

वांग्यामध्ये कॅलरीची प्रमाण अत्यंत कमी असते, म्हणून कॅलरीची काळजी करणार्‍या आणि वजन काबूत ठेवणार्‍यांना वांगी हा उत्तम आहार आहे. वांग्यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे , लोह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे असते. आयुर्वेदात वांग्याचे औषधी महत्त्व सांगितले आहे. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. जादा वांगी सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते आणि मुतखडा कमी होतो. वांगी यकृताच्या विकारांवरही गुणकारी असल्याचे आढळून आले आहे. वांग्यापेक्षा देठात, विशेषत: काटेरी देठात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात, म्हणनू वांग्याची भाजी देठासह करावी. 

देश-विदेशात खाण्यासाठी वांग्याचा उपयोग | Use of eggplant for domestic and foreign consumption 

आहारात वांग्याचा अनेक प्रकारे उपयोग होतो. जसे भाजी, कालवण, भरलेली वांगी, भरीत, वांगी-भात, वांग्याची भजी, दही-वांगी इत्यादी. वंाग्याच्या चकत्या वाळवून नंतर त्यांचा वापर करता येतो.रब्बी हुरड्याबरोबर तळलेली वांगी कर्नाटकात आणि महाराष्ट्राच्या काही भागात आवडीने खाल्ली जातात. वांगी कच्ची खाण्यासाठी कोशिंबीर म्हणूनही उपयोग करता येतो. 

    काही ठिकाणी मटण आणि भात भरून वांगी करतात तर काही ठिकाणी चीज, क्रीम लावून मेजवानीसाठी वापरली जातात. परदेशात वांगी फ्राय, ब्रॉइल्ड्, ग्रील्ड्, मायक्रोव्हेव्हड्, बेकड्, प्युरीड, ब्रेडेड अशा विविध प्रकारे खाल्ले जाते. भारताबरोबरच वांगी जपान, स्पेन, इटली, ग्रीक या देशांमध्ये आवडीने खाल्ली जातात. जसं आपल्याकडे भरीत करतात तसं मध्य आशियाई देशात बाबा घानूश नावाचा पदार्थ करतात. युरोप व अमेरिकेत शाकाहार व भाज्यांचे प्रस्थ वाढत आहे. त्यामुळे वांगी निर्यातीला मोठा वाव निर्माण झाला आहे. 

वांगी आणि ऍलर्जी | Eggplant and allergies

वांग्याचे वरीलप्रकारे महत्त्व आणि प्रसिद्धी बघून सर्वांनी हरखून जाण्याची आवश्यकता नाही. कारण काही माणसांना वांग्याची तीव्र किंवा मंद ऍलर्जी असू शकते. काही लोकांना वांगी खाल्ल्यावर त्वचेला, तोंडाला खाज सुटते. थोड्याफार प्रमाणात डोके दुखते आणि पोट बिघडते. काहींमध्ये ऍलर्जीची लक्षणे त्वरीत तर काहींमध्ये दोन तासांनी दिसायला सूरू होतात. काही लोकांना वांग्याच्या पानांची आणि फुलांची ऍलर्जी असल्याचे आढळून आले आहे. 

बी.टी.वांगे | B.T. Brinjal

बीटी ब्रिंजल म्हणजे जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकसित करण्यात आलेली वांग्याची नवी जात, ही जात जेव्हा भारतात लागवडीसाठी आणण्याचा प्रयत्न झाला होतो, तेव्हा पूर्ण भारतभर बीटी वांग्यास विरोध झाला होता. असे हे वांगे आम्हाला अजिबात नको, असे म्हणत मिझोराम, तामिळनाडू, छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेश यांच्यासह दहा राज्यांनी बीटी वांग्याविरोधात ठोस स्वरूपाची भूमिका घेतली होती. 

    बीटी वांगे विकसित करण्याचे तंत्रज्ञान हे मोन्सोन्टो या अमेरिकी कंपनीचे आहे, म्हणून विरोध झाला असे नसून अशी वांगी खाण्यास उपयुक्त नसल्याची शक्यता असल्याने विरोध होत आहे. या वांग्याला कीटकनाशके लागणार नाहीत, कारण त्यामध्ये करण्यात आलेले जनुकीय बदलच असे आहेत की वांग्याला कीड लागलीच तर मरून जाईल. याचे कारण जनुकीय बदलांमुळे या वांग्यात तयार होणारे विशिष्ट प्रथिने हे किडीसाठी विष ठरते. परंतु जे प्रथिन एका सजीवाला घातक ठरते, ते माणसासाठी सुरक्षिय आहे काय, अशी शंका अनेक भारतीय तंज्ञानी उपस्थित केल्याने सध्यातरी भारतात बीटी वांग्यास परवानगी दिलेली नाही. 

निष्कर्ष (Conclusion)-

    वांग्यापासून निर्माण होणारे निरनिराळे पदार्थ वेगवेगळ्या प्रदेशात तेथील आवडीनुसार खाल्ले जातात, या आवडी पूर्ण करण्यासाठी वांग्याच्या निरनिराळ्या आकाराच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. तसेच वांग्याची वर्षभर लागवड करता येत असल्यामुळे, विविध प्रकारच्या हवामानात आणि जमिनीत सहज लागवड होत असल्यामुळे वांगे सरस ठरते. तसेच इतर प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या तुलनेत वांग्याची टेबल लाईफ चांगली आहे. देशात -परदेशात सुद्धा वांगी प्रसिद्ध आहेत. बाजारातील मागणी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने वांगी लागवडीचे नियोजन केल्यास वर्षभर नफा देणारे असे हे वांगी पीक आहे. अन्न प्रक्रिया उद्योग आता वांग्यावर प्रक्रिया करून नवनवीन पदार्थ कसे बनविता येतील, याकडे गांभीर्याने बघत आहे. अशा प्रकारे वांगे उत्पादनास भरपूर वाव निर्माण झाला आहे.

माहिती संकलन-

- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author
-------------------------------------
Photo Source- 1) Photo by catrinafarrell on Unsplash,2) agriculture-aubergine-close-up-cook-321551 Photo by VisionPic .net from Pexels, Photo by AjaCooke on Unsplash

भाजीपाल्याचा राजा वांगी | Brinjal Is King Of Vegetables  भाजीपाल्याचा राजा वांगी | Brinjal Is King Of Vegetables Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जुलै २४, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.